आयपीएलचं 18वं पर्व सुरु होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. त्यानंतर दोन महिने क्रीडारसिकांना मेजवानी मिळणार आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी बरंच काही सुरु आहे. क्रिकेटपटूंच्या वैयक्तिक आयुष्यात बरंच काही घडत आहे. असं असताना मोहम्मद सिराजचं खासगी आयुष्यही चर्चेच आलं आहे. मोहम्मद सिराज आणि माहिरा शर्मा एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र माहिरा आणि तिच्या आईने वारंवार उडणाऱ्या या अफवांचं खंडन केलं आहे. माहिरा गुरुवारी मुंबईच्या एका पुरस्कार कार्यक्रमाला हजर होती. यावेळी पॅपराजीने तिच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. तिला वारंवार आयपीएलबाबत प्रश्न विचारले. पॅपराजीने आयपीएलमधील आवडत्या संघाबाबत तिला विचारलं. मात्र माहिराने पॅपराजीच्या प्रश्नांना उत्तरं दिली नाही. फक्त हसून त्या प्रश्नांना बगल दिली.
माहिरा आणि पॅपराजीच्या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सिराजच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. त्याने पॅपराजींना पोस्ट करत खडे बोल सुनावले आहेत. माझ्याबाबत कोणालाही प्रश्न विचारू नका अशी विनंती केली आहे. सिराजने आपल्या पोस्टमध्ये कोणाचं नाव घेतलं नाही. सिराजने शुक्रवारी केलेल्या पोस्टमध्ये हात जोडलेली इमोजी टाकत विनंती केली आहे. ‘मी पॅपराजीला विनंती करतो की, माझ्याभोवती प्रश्न विचारणे थांबवावे. हे पूर्णपणे खोटे आणि निराधार आहे. मला आशा आहे की हे सर्व संपेल.’ असं इंस्टास्टोरी ठेवली होती. मात्र काही मिनिटातच त्याने ही स्टोरी डिलिट केली.
मोहम्मद सिराज आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाकडून खेळणार आहे. माहिरा रेड कार्पेटवर आली तेव्हा पॅपराजीने प्रश्नांचा भडिमार केला. ‘आयपीएल सुरु होत आहे. माहिरा तू कोणत्या बाजूने आहेस? कोणत्या संघाला पाठिंबा देत आहेस? तुझी आवडती टीम कोणती?’ पॅपराजीच्या प्रश्नांना उत्तर मिळत नसल्याचं पाहून त्यांनी तिला डिवचण्याचा प्रयत्न केला. ‘मॅम, तुमची आवडती टीम गुजरात का? माहिरा फक्त गुजरात, केम छो..’ इतकं बोलूनही माहिराने कोणतंच उत्तर दिलं नाही. उलट फक्त हसत राहिली.