भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा गुरुवारी कायदेशीररित्या घटस्फोट झाला. यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दोघांच्या घटस्फोटाला मान्यता दिली. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचे डिसेंबर २०२० मध्ये लग्न झाले होते. परंतु दोघेही जून २०२२ पासून वेगळे राहत आहेत. त्यांनी कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. यामध्ये दोघांनीही ६ महिन्यांच्या कूलिंग ऑफ कालावधीतून सूट देण्याची मागणी केली होती.
धनश्री - युजवेंद्र २०२२ पासून वेगळे राहत होते
युवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा २०२२ पासून वेगळे राहत होते. दोघांच्या घटस्फोटाची बातमी आल्यापासून, धनश्री आणि चहल दोघांनीही सोशल मीडियावर अनेक गूढ पोस्ट शेअर केल्या होत्या. युजवेंद्र आणि धनश्रीने एकमेकांना इनस्टाग्रावर अनफॉलो केले होते. चहलने धनश्रीसोबतचे सर्व फोटो डिलीट केले होते. २०२२ मध्येही मतभेदामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. तेव्हा धनश्री वर्माने 'चहल' हे आडनाव काढून टाकले होते. काही वेळाने दोघांनाही सर्व काही नीट असल्याचे सांगितले.
मुंबई उच्च न्यायालय महत्वाचा निर्णय
उच्च न्यायालयाने युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या केसमध्ये काल महत्वाचा निर्णय दिला. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने चहल आणि धनश्रीच्या घटस्फोटासाठी 6 महिन्यांचा कूलिंग-ऑफ कालावधी माफ करण्यास नकार दिला होता. मुंबई उच्च न्यायालयाने वांद्रे कौटुंबिक न्यायालयाचा हा निर्णय रद्द केला आहे. घटस्फोटाच्या याचिकेवर अंतिम निर्णय देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने कुटुंब न्यायालयाला दिले होते. चहलच्या आयपीएलमधील सहभागावर परिणाम होऊ नये म्हणून अशी मागणी करण्यात आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चहलने अटींनुसार धनश्री वर्माला ४.७५ कोटी रुपयांची कायमस्वरूपी पोटगी देण्याचे मान्य केले.
युजवेंद्र चहल-धनश्री वर्माची प्रेमकहाणी
लॉकडाऊन दरम्यान, क्रिकेटपटू युजवेंद्र चहलने सोशल मीडियावर कोरिओग्राफर धनश्री वर्माचे डान्स व्हिडिओ पाहिले आणि त्याने तिच्याकडून डान्स शिकण्यासाठी संपर्क साधला. त्यांचे नाते लवकरच प्रेमात बदलले. यानंतर युजवेंद्रने धनश्रीला प्रपोज केले. डिसेंबर २०२० मध्ये हे दोघेही लग्नबंधनात अडकले.
युजवेंद्र धनश्री वर्माच्या घटस्फोटामागील नेमकं कारण काय?
एका मीडिया रिपोर्टनुसार, दोघांनीही कुटुंब न्यायालयात सांगितले होते की, ते गेल्या १८ महिन्यांपासून वेगळे राहत आहेत. चहल आणि धनश्री यांना वेगळे होण्याचे कारण विचारले असता, त्यांनी कम्पॅटिब्लिटी इश्युज हे मुख्य कारण असल्याचे सांगितले. याचा अर्थ दोघांमध्ये एकमत होण्यास आणि एकत्र राहण्यास असमर्थता होती.
कूलिंग ऑफ पिरियड म्हणजे काय?
हिंदू विवाह कायद्याच्या कलम १३ ब अंतर्गत घटस्फोट घेण्यासाठी ६ महिन्यांचा कूलिंग ऑफ पीरियड आवश्यक आहे. परस्पर संमतीने घटस्फोट झाल्यास, पती-पत्नीला एक वर्ष वेगळे राहावे लागते आणि नंतर दुसऱ्या मोशनमध्ये 6 महिन्यांचा कूलिंग ऑफ कालावधी घालवावा लागतो.