परस्परांच्या धर्माचा आदर करून सहिष्णूतेचा संदेश देणाऱ्या एकूण भारतीय मानसिकतेवर 1990 नंतर मोठा प्रहार झाला.
संवैधानिक मूल्यांच्या वापरातून, गैरवापरातून आणि बहुसंख्यांक बळाच्या ताकदीवर केवळ अल्पसंख्याक म्हणूनच नव्हे, तर एकूणच व्यवस्थेतून मुसलमानांना बाजूला करणे सुरू झाले.
या 20-22 वर्षांमध्ये केवळ अस्मिता प्रतीकांपेक्षा मुसलमानांच्या अस्तित्वाचेच प्रश्न गडद होत आहेत.
समकालात मुसलमानांचे वंचितीकरण ठळकपणे जाणवू लागले आहे आणि दुय्यमत्वाच्या तळाशी गाडले जाण्याची भीती या समूहांच्या मनात पक्की होते आहे.
या दडपशाही विरोधात साहित्य, गट-संस्था आणि कार्यकर्ते यांच्या उभ्या राहणाऱ्या लढ्यांमध्ये सातत्य आहे. असं असलं तरी तणाव, भीती किंवा दंगलींसंदर्भात पुढे येणारे पर्याय आणि प्रयत्नांची दिशा अद्याप स्पष्ट नाही.
मुसलमानांचे किंवा त्यांच्या बाजूचे सामाजिक, राजकीय नेतृत्व नाही आणि तथाकथित सेक्युलर पक्ष, संघटना आपल्या बहुसंख्यक मतांची चिंता करत पीडितांसाठी आवाज उठवणे लांबच जवळही येऊन उभे राहण्यास मागे पुढे करतात.
अप्रत्यक्षरित्या होत असणाऱ्या सगळ्या घटनांसाठी ही मूक संमतीच कारणीभूत आहे. अशाप्रकारचा नैतिक ऱ्हास केवळ मुस्लिम प्रश्नांबाबत होतच आला आहे.
या सगळ्यांत अखेर बळी मुसलमानांचा जातोच आणि सगळं काही वैचारीक मांडण्यापुरते उरते, असे दिसून येते.
केवळ पुस्तकी पांडित्यातून निर्माण झालेली मते आणि समन्वय-सहिष्णुता समभावाच्या मांडणीत मुसलमान समूहांच्या थेट जगण्याबद्दलच्या आकलनाचा अभाव यामुळे मुसलमान समाज आणि धर्मनिरपेक्षता-कट्टरता-सहिष्णुता यांचे चर्चाविश्व खूप मर्यादीत वर्तूळात फिरत राहिल्याचे जाणवते.
परिणामी हे प्रयत्न चर्चेपुरते सीमित राहतात. सामान्य मुसलमानांविषयी धर्म आणि त्यांची प्रतीके यावरच चर्चा विश्व रंगवलं जाते पण गेल्या दहा पंधरा वर्षात सच्चर किंवा मिश्रा समितीवर कुणीही थेट चर्चा केलेली आढळत नाहीं.
मुस्लीम-ओबीसींसारख्या चळवळींचे नेमकं घोडं कुणी अडवलं की पळवलं, हे देखील कुठेही उल्लेखीत होतं नाही.
एकूणच भारतीय मुसलमान वा प्रादेशिक उदाहरणार्थ महाराष्ट्राचा मराठी मुसलमान याबाबतचे आकलन एककल्ली किंवा एकसारखे म्हणजे एकजिनसी समजूनच केले जाते आहे.
वस्तूतः भारतीय मुस्लीम समाज हा, त्या त्या भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक वास्तवाच्या गुंतागुंतीत घडत-बिघडत राहिलेला आहे. तो एकजिनसी नाही, ही बाब सतत दुर्लक्षित राहिली.
इस्लाममध्ये जरी जात व्यवस्था नसली, तरी ती भारतीय मुसलमानात आहे.
सुतार, दर्जी, अत्तार, मनियार, देसाई, गवंडी, शिकलगार, तांबोळी, पिंजारी, नदाफ, कसाब अशा उतरंडीतून सहज दिसून येते. यात रोटी व्यवहार होतो, पण बेटीबाबतीत आजही भारतीय जातव्यवस्थेची मुळं इथं काम करतात. लग्न म्हणूनच्या व्यवहारात उच्चनीचता बघितली जाते.
एकीकडे त्या त्या प्रदेशातील सगळ्या बहुल असणाऱ्या संस्कृतीच्या खाणाखुणा त्या प्रांतातल्या परंपरानुसार मुसलमानांमध्ये दिसून येतात.
लग्नात हळदी मेंदी अथवा मंगळसूत्र इतकेच काय बंगाली मुसलमान टिकली बिंदी माथ्यावर लावण्याचा रिवाज हा बहुल हिंदू जातव्यवस्थेला धरून आहे.
कुलदैवत म्हणून आपापल्या पीर दर्ग्यासाठी जाणे, दर्गा तत्सम धार्मिक स्थळाशी असणाऱ्या श्रद्धेतून नवस करणे, फेडणे हे सगळे जिल्हानिहाय तिथल्या लोकपरंपरातून जसेच्या तसे जगण्यात आले आहे.
अशा अनेक प्रथा इस्लाममध्ये नाहीत. पण भारतीय किंवा मराठी मुसलमानांमध्ये हे उत्सवी किंवा नवस-सायास करण्याची पद्धत सर्वज्ञात आहे.
राज्य, प्रांत, भाषा बदलानुसार मुस्लिमांची ओळख ही भिन्न आहे. केरळी मुसलमान, मराठी-मुसलमान, कोकणी-काश्मिरी मुसलमान यांचे एकूण जगणे भिन्न आहे. त्या-त्या प्रांतातील भूगोलातील जगण्याची पद्धत रीतभात, गावगाडा, सहजीवन हे सगळं वेगवेगळे आहेत.
प्रादेशिक मुसलमान हा धार्मिक इस्लामपेक्षा अगदी भिन्न आहे. पारंपरिक शहाणपणातून आलेलं सरमिसळ जगणं, एकमेकांची संस्कृती सहज स्वीकारणं, आणि प्रादेशिक म्हणून बारसं ते मृत्यूपर्यंतची भिन्नता ही लोकजीवनाच्या संवादी परंपरेतून आली आहे .
सबब राजकीय,सामाजिक-सांस्कृतिक व्यवहारांमध्ये मुस्लिमांची बाजू घेताना किंवा विरोध करताना समाजाने मुस्लीमांबाबत सगळीकडचे मुस्लीम एकसारखेच असा समज रूढ करून त्यांचं वेगळेपण नाकारलं आहे.
दिल्लीचा मुसलमान आणि गल्लीतला मुसलमान एकसारखा नाही. त्याचे ठिकाण, त्यांची भाषा, प्रांतीय व्यवहार, लोकपरंपराशी त्याचे सहजीवन हे जिल्हा-गावनिहाय अगदीच भिन्न आहे.
सध्याच्या असहिष्णू, द्वेषमूलक परिस्थितीमध्ये अल्पसंख्यांक विशेषतः मुस्लीम समूह अनुभवत असलेले दडपण, नाकारलेपण, भीती, यामध्ये टिकून रहाताना त्यांची होणारी ससेहोलपट, प्रांतनिहाय वेगळंपण जपणाऱ्या सामान्य मुस्लिमांचे वर्तन याबाबतची वस्तुस्थिती समोर आणण्याची निकड प्रकर्षाने जाणवत आहे.
मुसलमान म्हणजे नक्की कोण? देशाच्या इतिहासात त्याचे योगदान काय? ते कोणाचा वारसा सांगतात? त्याच्या अस्मिता कशाशी जोडलेल्या आहेत?
कोणत्या प्रतिकांतून त्या व्यक्त होतात? या आणि अशा अनेक मुद्द्यांबाबत व्यापक समाजाची काही नेमकी समज तयार होण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न आवश्यक आहेत.
तत्कालीन समाजसुधारक-सुधारणावादी एकूण चळवळी, लेखक विचारवंताच्या साहित्यकृती (काही अपवाद वगळता) ज्या एककल्ली आणि सदोष मांडणीतून मुस्लीम समूहाचे चित्रण पुढे येते.
मुसलमान समूहांच्या प्रांतनिहाय विचार-वर्तनातील साम्यता-वेगळेपणाच्या नोंदी गायब करणे. मुसलमान समूहांना व्यक्तिगत आणि सामूहीक पातळीवर मिळणारा अपराधभाव, नाकारलेपण व पूर्वग्रहदूषित वागणूक याबद्दल सामान्यांच्या भावना, मते समजून न घेणे.
स्वतःच्या तसेच व्यापक समाजातील कट्टरतावादाला सामोरे जाण्याच्या मुस्लीम समुहांच्या पद्धतींविषयी काहीच आकलन नसणे. अशा अनेक कारणांनी दुय्यमत्व लादलं आणि लादूनही घेतलं जातंय.
सद्यस्थितीतील धर्मांधता, कट्टरवाद व विद्वेषावर प्रांतनिहाय उपाय आणि व्याप, सामान्य माणसांच्या जगण्यात मुस्लीम समाजाबाबतचा अविश्वास-संशय गेल्या काही वर्षांमध्ये अधिक वेगाने गडद होऊ लागला आहे.
सबब मुस्लीम समूह अधिकाधिक आरोपीच्या पिंजऱ्यात, बंदीस्त चौकटीत ढकलला जातो आहे.
या बंदीस्त समूहांतील सामान्य मुस्लिमांची घुसमट व्यक्त व्हावी, विक्टीम वा विक्टीम करू पाहणाऱ्या घटनांना ते कसे सामोरे जातात, यावर त्यांच्याशी बोलावं आणि समाज कसा याला सामोरा जातो आहे याची वस्तुस्थिती लोकांसमोर यावी.
मुस्लीम समाज बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःमध्ये कसे बदल घडवून आणत आहे किंवा परिस्थिती कशी त्याला बदलण्यास भाग पाडत आहे, याचा लेखाजोखा विस्तृत प्रमाणात बोलला-लिहिला गेला पाहिजे.
रोजरोज जोमाने फोफावणारा कट्टरवाद व धर्माध मानसिकतेच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम समूहांची प्रांत/जिल्हानिहाय असणारी लोकसंस्कृती/लोकाचार यात रस्त्यावरल्या, असुरक्षित-अर्धपोटी असणाऱ्या लोकांशी बोलल्याशिवाय, त्यांची मतं जाणून घेतल्याशिवाय यावरची चर्चाच अपुरी राहील, ही बाब लक्षात घेऊन सर्व स्तरातील मुस्लीमांचं जगणं मांडणे अधिक ठळक व्हायला हवं.
पण तसे करण्याची कसलीच व्यवस्था नाही किंवा व्यवस्था हे अले काही वर येऊच नये म्हणून दुसरेचं प्रश्न निर्माण करून पुढ्यात रोज ठेवते आहे.
मुस्लिमांचा धर्म इस्लाम आहे. हे समानधर्मी वैशिष्ट्य नजरेसमोर ठेवून सर्व मुस्लिमांचा विचार एकाच पातळीवरून करण्याची अहमिका सुरू असते. त्याआधारे काही निष्कर्षही नोंदविण्यात येतात.
दुर्दैवाने भारतीय मुस्लीम समाज समजून घेण्याची ही पद्धत चुकीच्या गृहीतकावर आधारीत आहे. कारण धर्म एक असला तरी प्रत्येक प्रदेशातील मुस्लिमांचे व्यक्तिगत, सामाजिक व्यवहार, भिन्न भिन्न असून त्या त्या प्रदेशाच्या भाषिक, सांस्कृतिक, सामाजिक जाणिवांना आपलेसे करीत मुस्लीम समाजाचे वर्तन होते असते.
सहिष्णुता किंवा तत्सम शब्दप्रयोगांनी आपलं कार्य व्यवस्थापूरक की विरोधात होतंय, याचीदेखील पडताळणी करणं गरजेचं आहे.
जगण्याच्या प्रश्नाशिवाय उगाच मोठेपणा मिरवत येणाऱ्या तात्पुरत्या सांत्वनी गोष्टींना थारा न देता समजेचा परीघ वाढवला गेला पाहिजे.
चांगल्या साहित्याची निर्मिती यापूर्वीही झाली आहे. पण, एकूण मुस्लिम समूहाला त्यांचे म्हणणे म्हणून किती पडसाद यात आलेत याबद्दल विचार करणं, वाचला-लिहिला जाणारा आणि प्रत्यक्षात असणारा मुस्लिम यातील तफावत दूर करण्यासाठी नागरिक म्हणून तरी न्याय बाजू मांडत राहील पाहिजे.
सांस्कृतिक अस्मितावरचा घाला, केवळ उरूस-जत्रा म्हणून हौशी उरलेलं साहित्यपण आणि व्यवस्थावाहक वा व्यवस्थाशरणता मानून गप्प गोड उरलेल्या बौद्धिक-राजकीय क्षेत्रातल्या मंडळींना सोडल्याशिवाय सामान्य मुसलमानांना कोणताच पर्याय दिसत नाही.
गेल्या पंधरा वर्षांच्या काळात सातत्याने मुसलमान समूहाच्या विकृतीकरणाचा कळस गाठला आहे. दररोज मुस्लिमाविरुद्धचा कोणता न कोणता मुद्दा समोर आणून त्यांना त्यातील क्रिया-प्रतिक्रियात अडकवून व्यवस्था मोकळी होते. हा फेरा सतत सुरूच आहे.
प्रदेशनिहाय यावर उत्तर शोधण्याची धडपड काही मुस्लीम बुद्धिजीवी किंवा तुरळक असणाऱ्या कमी ताकदीच्या संघटना करत आहेत. पण म्हणावं तितकं अद्याप यश नाही.
असुरक्षित वाटण्याच्या अथवा भयप्रद असण्याच्या काळात मुस्लिमांपर्यंत केवळ धर्मसुधारणा चळवळी, धार्मिक संघटना किंवा धर्मातल्या विविध पंथाचे लोक पोहचले. त्यांना आधार दिला आणि ओळखही दिली. त्यातून झालेल्या काही सुधारणांना पुरोगामित्व पत्करणाऱ्या संघटनानी नाकारले आहे.
धार्मिक असणाऱ्या किंवा दिसणाऱ्या मुसलमानाला कट्टर किंवा धर्मांध ठरवून सगळे नामानिराळे होताहेत. रस्त्यावरच्या सामान्य मुस्लिमांच्या बाबतीत कसलेही आकलन नसणाऱ्यांकडून एकीकडे उजव्या उन्मादाने अधिक हिंसक रूप धारण करून केलेले हल्ले आणि मुस्लिमांविषयीच्या द्वेषाच्या पसरवलेल्या खोट्या गोष्टी यातून मुस्लिमसमूह अधिकाधिक उपरापरका उरला आहे.
अगदी मराठी मुस्लिमाविषयी बोलायचं म्हटलं तरी तो प्रदेशवार वेगळा आहे. कोकणी मुसलमान, कोल्हापूरी मुसलमान, वैदर्भीय मराठवाडी मुसलमान यांच्या रीतीभाती परंपरा जगणं हे त्या त्या प्रदेशातील भागातील संस्कृतीनुसारच आहेत. मराठी प्रदेशवार राहणाऱ्या मुसलमानांची प्रत्येक बाबतीत भिन्नता आहे. खानपान, राहणीमान, बोलीभाषा, कपडे वेशभूषा, ऐतिहासिक अस्मिता, सण साजरा करण्याच्या पद्धती, हे सगळं भिन्न आहे.
असं सगळं असताना उजव्या मांडणीतून उगाच त्याच्या एकजिनसी असण्याच्या गोष्टीला बळकटी देऊन त्यावर त्यांचे आरोपींकरण करने सुरूच आहे बाबरीच्या विध्वंसानंतर यात अधिकची भर आजतागायत पडतच राहिली आहे.
देशभरातील घटनांचा विचार करता बहुतांशी सामान्य मुसलमान हा रोजी रोटी आणि आपल्या पोरांबाळांच्या भविष्यात चिंताग्रस्त आहे. गेल्या पंधरा वर्षांत उपरे व परके असण्याच्या रडक्या भावनेनं ग्रस्त असा मोठा समूह प्रांतवार आढळतो. धर्म आणि प्रादेशिक लोकसंस्कृती गावातील लोकाचार,समाजसंस्कृती, भाषा संस्कृती ही प्रांतानुसार एकमेकांहून भिन्न आहे. याचे एकजिनसीकरण शक्य नाही.
समाज सुधारणा तसेच जातवर्गनिहाय निष्ठा,प्रतीके आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचेही एकजीनसीकरण होऊ शकत नाही. म्हणून एकजिनसी नसणाऱ्या मुस्लीम धर्म समुहाचे ठोकळेबाज, ढोबळ एकांगी आकलन धर्मांधजहराला बळकटी देण्याचेच काम तर करत नाही ना? म्हणून मराठी मुसलमानांच्या रोजच्या जगण्याच्या व्यवहारातून आलेल्या, कोंडीत पकडून दुय्यम किंवा पाचव्या वर्णात ढकलून देणान्या व्यवस्थेचा जोर वाढताना, बहुल मागास, गरीब-अडाणी आणि गाव-गाड्यानुसार लोकाचारातून जगणाऱ्या मुसलमानाची नेमकी मानसिकता व प्रतिक्रिया काय, कशी, त्यावरील उपाय काय, यावर न बोलता केवळ धार्मिकतेच्या मैदानात भांबावून त्यांना केवळ उकसवत राहून मजा घेण्यात काय हाशील?
भारतीय मुसलमानात जातीवर्णता आहे. धार्मिक गटतट पंथभेद आहेत. मुसलमान सर्वत्र एकचभाषिक नाहीत त्याला जोडून येणारी संस्कृतीही एक नाही. म्हणून तो एकजिनसी नाहीच. पण मुसलमानांचा कोणताही प्रश्न केवळ अस्मिता द्वेष शत्रूस्थानी यातूनच पुढे रेटायचा कारभार घडविला जात आहे
यातून सामान्य मुसलमानांच्या जगण्याचे काहीएक उत्तर मिळत नाही. खरंतर अस्मितेपेक्षा मुसलमानांच्या अस्तित्वाचा प्रश्न सध्या निकडीचा झाला आहे. त्याची उत्तरं शोधायचे तर त्याचे आकलन एकसाची असण्याचे नाकारूनच पुढे यावे लागेल.
खेदाची बाब ही आहे की, जगातल्या सर्व समूहाला सामाजिक शास्त्र लागू होते. पण फक्त भारतीय, मराठी मुस्लिमांना ती लागू होत नाही. त्यांना फक्त धार्मिक एकजिनसी परिप्रेक्षामध्ये बघितले जाते.
'मैं अगर चुप रहा तो और गलतफ़हमीयां बडी
उसने वो भी सुना हैं जो मैने कहा ही नहीं!!'
(साहिल कबीर हे लेखक आहेत आणि या लेखातील मते त्यांची वैयक्तिक आहेत.)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.