मुंबई : भारतीय शेअर बाजारात ऑक्टोबर 2024 पासून सुरु असलेली घसरण थांबत असल्याचे संकेत मिळत आहेत. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात पुन्हा खरेदी सुरु केल्यानं आणि कमी किमतीवर शेअर खरेदी मोठ्या प्रमाणावर झाल्यानं शेअर बाजारात तेजी परतली आहे. 17 मार्च ते 21 मार्च या काळात सलग पाच दिवसांमध्ये तेजी पाहायला मिळाली. या पाच दिवसांच्या तेजीनं शेअर बाजाराचं चार वर्षांचं रेकॉर्ड मोडली आहे.
सेन्सेक्स 558 अंकांनी वाढून 76906 अंकांवर बंद झाला. निफ्टी 50 मध्ये देखील 160 अकांची तेजी पाहायला मिळेल. निफ्टी 50 निर्देशांक 23350 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 4.3 टक्क्यांची वाढ झाली. 22 जुलै 2022 नंतर सेन्सेक्सची एका आठवड्यातील सर्वोत्तम कामगिरी राहिली. निफ्टीमध्ये 5 फेब्रुवारी 2021 नंतर सर्वोत्तम कामगिरी एका आठवड्यात राहिली. निफ्टी मिडकॅप 7.7 टक्के तर निफ्टी स्मॉलकॅप 8.6 टक्के वाढला.
शेअर बाजारात तेजी असल्यानं मुंबई स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट असलेल्या कंपन्यांच्या बाजार मूल्यात वाढ झाली. शुक्रवारी बाजारमूल्य 4.7 लाख कोटींनी वाढलं. या आठवड्यातील पाच दिवसांमध्ये बाजारमूल्य 22 लाख कोटी वाढून 413 लाख कोटी झालं आहे.
सेन्सेक्स सध्या उच्चांकापासून 8.8 टक्के खाली आहे. तर, निफ्टी 9.5 टक्के खाली आहे. निफ्टी मिडकॅपमध्ये 13.8 टक्के तर स्मॉल कॅपमध्ये 15 टक्क्यांची घसरण झाली आहे.
विश्लेषकांच्या माहितीनुसार शेअरच्या किमती घसरल्यानंतर कमी किमतीवर स्टॉक खरेदीला गुंतवणूकदारांकडून जोर दिला जात आहे. याशिवाय विदेशी गुंतवणूकदारांनी 3239 कोटींच्या शेअरची खरेदी केली. तर, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 3136 कोटी रुपयांच्या स्टॉक्सची विक्री केली.
अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हनं व्याजदरात दोनवेळा कपातीचा अंदाज वर्तवला आहे. यामुळं गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे. डिसेंबर ते मार्च या तिमाहीतील कामगिरी, आरबीआयकडून एप्रिलमध्ये जाहीर होणारं पतधोरण, अमेरिकेचं व्यापार धोरण यावर शेअर बाजारातील भविष्यातील कामगिरी अवलंबून असेल.
अल्फानिती फिनटेकचे सह संस्थापक यूआर भट्टनं म्हटलं की या आठवड्यात शॉर्टवर्किंगमुळं बाजारात तेजी आली आहे. मात्र, बाजारातील मजबुतीसाठी दीर्घकालीन विचार करुन खरेदीची गरज आहे.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
अधिक पाहा..