आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठीची (IPL 2025) क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. सामन्याचं आयोजन हे कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये करण्यात आलं आहे. या सामन्यावर पावसाचं सावट आहे. कोलकातामध्ये शुक्रवारी पाऊस झालाय. तर आज शनिवारी (22 मार्च) पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोलकातामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे.
पावसामुळे आतापर्यंत अनेकदा आयपीएल स्पर्धेतील सामने रद्द करावे लागले आहेत. त्यामुळे अखेरच्या क्षणी याचा फटका हा संबंधित संघाला बसतो. परिणामी त्या संघाला प्लेऑफसाठी क्वालिफाय करता येत नाही. यंदाही पावसामुळे काही सामने रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बीसीसीआय सामना निकाली निघावा, यासाठी प्रयत्नशील असते आणि आहे. बीसीसीआयचे याबाबत काय नियम आहेत? जाणून घेऊयात.
नियमांनुसार, आयपीएलमधील साखळी फेरीतील सामन्यांसाठी एक तास अर्थात 60 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जातो. सामन्याचा निकाल लागवा, या उद्देशाने वाढीव वेळेची तरतूद आहे. सामना अनेकदा विविध कारणामुळे थांबवावा लागतो किंवा थांबवण्यात येतो. अशात काही वेळ वाया जातो.
टी 20 क्रिकेटमधील नियमांनुसार, कोणत्याही सामन्याच्या निकालासाठी दोन्ही संघांमध्ये किमान 5-5 ओव्हरचा खेळ होणं बंधनकारक असतं. हाच नियम आयपीएल स्पर्धेसाठीही लागू आहे. पाऊस म्हणा किंवा इतर कोणत्याही कारणामुळे अनेकदा खेळ सुरु होण्याची वाट पाहिली जाते. आयपीएलमधील संध्याकाळच्या सामन्याला साडे सात वाजता सुरुवात होते. मात्र काही वेळेस 1-2 किंवा त्यापेक्षा अधिक वेळ प्रतिक्षा केल्यानंतरही सामना सुरु होत नाही.
त्यामुळे सामना निकाली काढण्यासाठी किमान 5-5 ओव्हरचा सामना खेळवण्यात येतो. मात्र त्यासाठीही वेळेची मर्यादा आहे. 5-5 षटकांच्या सामन्यासाठी रात्री 10 वाजून 56 मिनिटं ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, 10 वाजून 56 मिनिटांनी 5-5 षटकांच्या सामन्याला सुरुवात व्हायला हवी.
नियमांनुसार, संध्याकाळी सामन्याला 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात व्हायला हवी. तर 11 वाजता सामना संपायला हवा. मात्र पावसामुळे व्यत्यय आल्यास सामना रात्री 12 वाजून 6 मिनिटांपर्यंत पूर्ण व्हायला हवा. सामना निर्धारित वेळेत पूर्ण न झाल्यास पुढील निर्णय मॅच रेफरी आणि अंपायर घेतात.
पाऊस, वाईट प्रकाश या अशा आणि इतर कारणांमुळे पावसात व्यत्यय येतो. परिणामी ओव्हर कमी केल्या जातात. मात्र किती ओव्हर कमी करायच्या? याबाबतही नियम आहेत. नियमांनुसार 15 ओव्हर कमी करता येतात. अर्थात 5 ओव्हरची मॅच खेळवावी लागते. 5 पेक्षा ओव्हर कमी करता येत नाही. ओव्हर कमी केल्यास डकवर्थ लुईस (DLS) नियमाची अंमलबजावणी केली जाते.