आयपीएल 2025 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमवल्याने कोलकाता नाईट रायडर्सला प्रथम फलंदाजी करावी लागली. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. पण क्विंटन डीकॉक स्वस्तात बाद झाल्याने काही अंशी खिळ बसली. पण कर्णधार अजिंक्य रहाणेने आक्रमक खेळी करत टीमला सावरलं. त्याचा आक्रमक सुनील नरीनची उत्तम साथ लाभली. पण सुनील नरीन मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला. या सामन्यात एक वेळ अशी होती की सुनील नरीनची बॅट स्टंपला लागली होती. पण असं असूनही त्याला बाद दिलं नाही. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आरसीबीकडून आठवं षटक रसिख सलाम डार टाकत असताना हा प्रकार घडला. रसिखने राउंड द विकेटने चौथा चेंडू आखुड टप्प्याचा टाकला. हा चेंडू खेळण्याचा सुनील नरीनने पुरेपूर प्रयत्न केला. पण चेंडू विकेटकीपरच्या हातात गेला. त्या चेंडूची हाईट पाहून पंचांनी वाइड दिला.
चेंडू वरून गेल्यानंतर सुनील नरीनची बॅट स्टंपवरी बेल्सला लागली. स्टंपचा लाईट पेटला आणि बेल्ससुद्धा खाली पडली. त्यामुळे तो आऊट असेल असं प्रेक्षकांसह सर्वांना वाटलं. पण पंच आणि खेळाडूंनी त्याकडे लक्षच दिलं नाही. त्यामुळे हिट विकेट असूनही का बाद दिलं नाही? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. कारण पंचांनी हा चेंडू वाइड दिल्याने डेड झाला होता. त्यामुळे नरीनची बॅट स्टंपला लागून त्याला नाबाद दिलं गेलं. एमसीसी नियम 35.1.1 च्या अंतर्गत चेंडू खेळताना फलंदाजाची बॅट किंवा शरीराचा भाग स्टंपला लागला आणि बेल्स पडली तर हिट विकेट दिलं जातं. नरीनसोबत असा प्रकार घडला तेव्हा त्याने 17 चेंडूत 18 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने 26 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 44 धावा केल्या. रसिख सलाम डारने त्याला बाद केलं. दुसऱ्या विकेटसाठी नरीन आणि रहाणेने 103 धावांची भागीदारी केली.
कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष्ण रघुवंशी, सुनील नरेन, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, जोश हेजलवुड, यश दयाल.