आयपीएल 2025 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात बरंच काही घडलं. आयपीएल लिलावातील तिसरा महागडा खेळाडू असलेला वेंकटेश अय्यर काय करतो? याकडे लक्ष लागून होतं. पण पहिल्याच सामन्यात अपयशी ठरला. बाद झाल्यानंतर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. डीकॉक स्वस्तात बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि सुनील नरीनने डाव सावरला. ही जोडी फुटल्यानंतर खर तर वेंकटेश अय्यरकडून मधल्या फळीत फार अपेक्षा होत्या. कृणाल पांड्याने अजिंक्य रहाणेची विकेट काढल्यानंतर दबाव वाढला होता. पण वेंकटेश अय्यर या संकटातून बाहेर काढेल अशी अपेक्षा होती. पण कृणाल पांड्याने असा माईंड गेम खेळला की पॅव्हेलियनमधून हेल्मेट मागवावं लागलं आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट पडली.
कृणाल पांड्या वैयक्तिक तिसरं आणि संघाचं 13वं षटक टाकण्यासाठी आला. समोर वेंकटेश अय्यर हेल्मेट न घालता उभा होता. पांड्याने पहिलाच चेंडू बाउंसर टाकला. हा चेंडू पाहून वेंकटेशला हेल्मेटची आठवण आली. पंचांनी त्याला इशारा दिला आणि हेल्मेट घालण्याची सूचना केली. त्यानंतर कृणाल पांड्याने फुलर चेंडू टाकला आणि त्याचा त्रिफळा उडवला. वेंकटेश अय्यर 7 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 6 धावा करून बाद झाला. वेंकटेश अय्यर त्यांच्या 23.75 कोटी रुपयांच्या किंमतीचे समर्थन करण्यात अपयशी ठरला.
आरसीबीकडून कृणाल पांड्याने जबरदस्त कामगिरी केली. संघाला कमबॅक करून देण्यात मोलाची साथ दिली. पॉवर प्लेमध्ये टाकलेल्या पहिल्या षटकात 15 धावा दिल्या होत्या. यात दोन चौकार आणि एक षटकार पडला होता. मात्र त्यानंतरच्या 3 षटकात फक्त 14 धावा देत 3 गडी बाद केले. त्याने 4 षटकात 29 धावा देत 3 महत्त्वाच्या विकेट घेतल्या. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे आरसीबीने केकेआरला 174 धावांवर रोखलं.