नागपूर : महाल परिसरातील हिंसाचारात हल्लेखोरांनी केलेल्या नुकसानाची भरपाई आरोपींकडून वसूल करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पोलिस आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाल परिसरात सोमवारी झालेल्या हिंसाचारात समाजकंटकांनी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली. त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानाचा आढावा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
त्यांना येत्या सात दिवसात नुकसानभरपाई मिळेल. मात्र, ज्यांनी हे कृत्य केले त्यांना सोडण्यात येणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. याशिवाय नुकसानाची संपूर्ण रक्कम त्यांच्याकडून वसूल केली जाईल. ती त्यांनी न दिल्यास त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात येईल. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे काहीच वेळात हिंसाचारावर नियंत्रण मिळवता आले असे सांगून त्यांच्या कामगिरीचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
हिंसाचारात सध्या १०४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेला असून ९२ जण अटक आहेत. यातील १२ आरोपी अल्पवयीन आहेत. सोशल मीडियावर हिंसाचारानंतर आलेल्या ६८ पोस्टवरून कारवाई करण्यात आली आहे. आता हिंसाचार घडविणाऱ्यांसह त्यांना मदत करणाऱ्यांना सहआरोपी करत कठोर कारवाई केली जाईल.
पोलिस विभाग कुणाचीही गय करणार नसून, शेवटचा गुन्हेगार मिळेपर्यंत कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. पत्रकार परिषदेला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विशेष पोलिस महानिरीक्षक डी.के. पाटील भुजबळ, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार उपस्थित होते.
धार्मिक मजकूर असलेली चादर जाळल्याचा आरोप खोटाहिसांचाराच्या घटनेपूर्वी दुपारी एका समुदायाकडून गांधी गोट परिसरात औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली. यावेळी धार्मिक मजकूर असलेली चादर जळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. मात्र, या आंदोलनात धार्मिक मजकूर असलेली चादर जाळल्याची अफवा पसरविण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
‘कर्फ्यू’बाबत परिस्थिती बघून निर्णयहिंसाचारानंतर अकरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ‘कर्फ्यू’ लावण्यात आला असून, दोन ठाण्यातील ‘कर्फ्यू’ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या नऊ ठाण्यांच्या परिसरात ‘कर्फ्यू’ कायम आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संचारबंदीत टप्प्याटप्प्याने शिथिलता आणण्यात येणार असून, हा निर्णय परिस्थितीनुसार घेण्यात येईल. पोलिसांकडून याबाबतच्या स्थितीचा आढावा घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.