न्यू इंडिया को ऑपरेटीव्ह बँक घोटाळा प्रकरण! आणखी एक आरोपी आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
Marathi March 23, 2025 07:25 PM

न्यू इंडिया सहकारी बँक घोटाळा: न्यू इंडिया को ऑपरेटीव्ह बँक घोटाळा (New India Cooperative Bank scam)  प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे. या बँक घोटाळ्या प्रकरणी आणखी एका आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. राजीव रंजन पांडे (Rajiv Pande) असं झारखंड वरुन अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.  अटक केल्यानंतर राजीव रंजन पांडे याला मुंबई किल्ला कोर्टात हजर केले आहे. किल्ला कोर्टाचे मुख्य न्यायाधीश विनोद पाटील याच्या दालनात हजर केले असता न्यायालयाने 28 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 122 कोटींच्या अपहार प्रकरणी आत्तापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी न्यू इंडिया को-ऑप बँकेतील 122 कोटींची रक्कम गहाळ झाल्याबाबत चौकशी केल्यानंतर 12 फेब्रुवारी रोजी सदर घोटाळा समोर आला होता. याप्रकरणी आतापर्यंत 8 जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेचे महाव्यवस्थापक आणि अकाऊंट विभागाचे प्रमुख हितेश मेहता, माजी सीईओ अभिमन्यू भोअन, बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन, मालाड येथील व्यापारी उन्नाथन अरूणाचलम आणि त्यांचे बंधू मनोहर अरुणाचलम आणि कंत्राटदार कपिल देढिया तसेच राजीव रंजन पांडे यांना अटक करण्यात आली आहे.

नवीन कर्जवाटपासह सहा महिन्यांसाठी ठेवी काढण्यावर बंदी

30 पेक्षा जास्त शाखा असलेल्या आणि बहुराज्य सहकारी बँकेचा दर्जा मिळविलेल्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादण्यासह तिचे संचालक मंडळ बरखास्त करणारी कारवाई केली. तसेच  या बँकेवर ‘प्रशासक’ नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे नवीन कर्जवाटपासह सहा महिन्यांसाठी ठेवी काढण्यावर बंदी घालण्याचा आदेश न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला देण्यात आले. त्यामुळे या बँकेच्या ठेवीदार आणि ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. बँक खातेदार आणि नागरिक हतबल झाले असून आरबीआयला देखील दोष देत आहेत. दरम्यान,  न्यू इंडिया को बँकेचे अनेक राजकीय व्यक्ती ही कर्जदार आहेत. अनेक मोठ्या रकमा कर्ज म्हणून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या बँकेला बुडवण्यात नक्की कोण कोण जबाबदार आहे हे तपासातूनच समोर येईल. मात्र, यात सर्वसामान्य ठेवीदार ज्यांची आयुष्यभराची कमाई ठेवली होती, तो मात्र हतबल होऊन रोज बँकेच्या दारात उभा राहतोय ही ह्रदयस्पर्शी घटना आहे.

महत्वाच्या बातम्या:

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना दिलासा, 25000 रुपयापर्यंतची रक्कम काढता येणार

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.