IPL 2025: मुंबई इंडियन्स विरुद्ध चेपॉकवर ऋतु'राज' अन् रचिननचा धोनीसमोर विजयी षटकार; CSK ची घरच्या मैदानात दणदणीत विजय
esakal March 24, 2025 06:45 AM

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने रविवारी मुंबई इंडियन्सला पराभूत करत मोहिमेची दणदणीत सुरुवात केली. चेन्नई सुपर किंग्सने चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) या घरच्या मैदानावर खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ विकेट्सने विजय मिळवला आहे. चेन्नईसाठी नूर अहमद, खलील अहमद, रचिन रवींद्र आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड विजयाचे हिरो ठरले.

या सामन्यात मुंबईने चेन्नईसमोर विजयासाठी १५६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग चेन्नईने १९.१ षटकात ६ विकेट्स गमावत पूर्ण केला.

या सामन्यात चेन्नईकडून नवी सलामी जोडी उतरली. त्यांच्याकडून रचीन रवींद्रसह राहुल त्रिपाठी सलामीला फलंदाजीसाठी उतरले होते. मात्र दुसऱ्याच षटकात राहुल त्रिपाठीला दीपक चाहरने यष्टीरक्षक रायन रिकल्टनच्या हातून झेलबाद केले. त्यामुळे राहुल त्रिपाठीला २ धावांवर माघारी परतावे लागले. पण नंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला, दुसऱ्या बाजूने रचिनने त्याला चांगली साथ दिली होती. ऋतुराजने आक्रमक खेळताना अर्धशतकही केले. पण अर्धशतकानंतर त्याला मुंबईचा इम्पॅक्ट सब विग्नेश पाथूरने विल जॅक्सच्या हातून झेलबाद केले. ऋतुराजने २६ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ५३ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर विग्नेश पाथूरने शिवम दुबे आणि दीपक हुडा यांनाही फार काळ टिकू दिले नाही. शिवम दुबेने ९ धावा केल्या, तर हुडाने ३ विकेट्स केल्या. सॅम करनही स्वस्तात माघारी परतला. त्याला विल जॅक्सने ४ धावांवर त्रिफळाचीत केले. त्यामुळे चेन्नईवरील दबाव वाढला होता. मात्र, तरी एका बाजूने रचिन रवींद्र चांगला खेळत होता. त्यानेही चांगले शॉट्स खेळत अर्धशतक पूर्ण केले. त्याला रवींद्र जडेजाने चांगली साथ दिली. पण विजयासाठी ४ धावांची गरज असताना जडेजा १७ धावांवर धावबाद झाला. त्यामुळे अखेर एमएस धोनी मैदानात उतरला.

तत्पुर्वी, चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १५५ धावा केल्या. मुंबईकडून तिलक वर्माने २५ चेंडूत सर्वाधिक ३१ धावांची खेळी केली. तसेच कर्णधार सूर्यकुमार यादवने २६ चेंडूत २९ धावांची खेळी केली. दीपक चाहरने अखेरीस १५ चेंडूत २८ धावांची नाबाद खेळी केली. मात्र, बाकी कोणाला खास काही करता आले नाही.

चेन्नईकडून नूर अहमदने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तसेच खलील अहमदने ३ विकेट्स घेतल्या. नॅथन एलिस आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.