नाशिक : ‘‘सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी नदीचे शुद्धीकरण केले जाईल. गोदावरी शुद्धीकरणाअंतर्गत नाशिकमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे जाळेही निर्माण केले जाईल. प्रकल्पासाठी १२०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पुढील महिन्यात कामांना प्रारंभ केला जाईल,’’अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. कुंभमेळ्याची पूर्वतयारी वेगाने करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्यात येत असून प्रयागराजच्या धर्तीवर लवकरच कायदा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी (ता.२३) त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा पाहणी दौरा केला. नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर सिंहस्थ आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सिंहस्थापूर्वी गोदावरी नदीचे शुद्धीकरण करण्यासाठीचा आराखडा तयार आहे. त्याअंतर्गत नाशिकमध्ये सांडपाणी प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. नाशिकमध्ये नवीन ११ पुलांची निर्मिती करताना साधुग्राम जागेचे भू-संपादन, घाटांची लांबी वाढविण्यासारखी कामे प्राधान्याने हाती घेण्यात येतील. गोदावरीच्या शुद्धीकरणासाठी खासगीकरणातून कामे करण्यात येणार असून पुढच्या महिन्यात या कामाला सुरूवात होईल असेही त्यांनी सांगितलं. कुशावर्त तीर्थाचे पाणी शुद्ध करण्यासाठी नगरपालिकेने तयारी केली असून त्यांना लवकर कामे करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, बारा ज्योर्तिलिंगापैकी महत्त्वाचे स्थान असलेल्या त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळ्याच्या माध्यमातून विकास केला जाईल. त्र्यंबकेश्वरसाठी अकराशे कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. सिंहस्थाच्या अनुषंगाने व सिंहस्थानंतर हाती घ्यायची कामे असे वर्गीकरण केल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे उपस्थित होते.
..जबाबदारी माझीचनाशिक-त्र्यंबकेश्वरमधील साधु-महंतांनी सिंहस्थाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, अशी मागणी केली आहे, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना,‘‘मुख्यमंत्री म्हणून सिंहस्थ ही माझी जबाबदारी आहे. जिल्हास्तरीय समिती लवकरच सिंहस्थाचा आराखडा उच्चाधिकारी समितीकडे सुपूर्द करेल. ही समिती अंतिम मान्यतेसाठी आराखडा माझ्या अध्यक्षतेखालील समितीला सादर करणार असून त्यास तत्काळ त्यास मान्यता दिली जाईल,’’ असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
विकासात प्राधान्य...त्र्यंबकेश्वर मंदिर व कुशावर्ताची देखभाल दुरुस्ती
शहरातील प्राचीन कुंडांना पूर्वस्वरुप देणार
दर्शनपथ, नदीघाटांचे नूतनीकरण व नवीन घाटांची निर्मिती
शौचालये, वाहनतळांची निर्मिती
ब्रह्मगिरीचा नैसर्गिक अधिवास जपताना भाविकांसाठी पदपथ
कुंभमेळ्यानिमित्त कामाला २०२० पासून सुरुवात व्हायला हवी होती, विकासकामांना उशीर झाला आहे, अशी कबुली मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. ‘‘आता काम गती धरत असून प्रशासकीय यंत्रणेने ‘रिव्हर्स प्लॅनिंग''नुसार कामाचे नियोजन आखले आहे. कुंभमेळ्याचा नवा आयाम तयार झाला आहे. सांस्कृतिक पुनरुत्थान होत असताना जनतेमध्ये संस्कृती, सभ्यता, आस्थेविषयी आवड वाढत आहे. येत्या कुंभमेळ्यात तंत्रज्ञान, इनोव्हेशनचा संगम बघायला मिळणार असून, ‘एआय’मुळे हा आस्थेसह तंत्रज्ञानाचा कुंभमेळा असेल,’’ असे ते म्हणाले.