Nagpur Updates : नागपुरात संचारबंदी उठविली, पोलिस आयुक्तांचा निर्णय; परिस्थिती आटोक्यात
esakal March 24, 2025 09:45 AM

नागपूर : नागपूरमधील महाल परिसरातील हिसांचारानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शहरातील संचारबंदी रविवारी (ता.२३) पूर्णपणे उठविण्यात आली. याबाबत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी रविवारी आदेश काढले. त्यानुसार दुपारी तीननंतर कोतवाली, गणेशपेठ, तहसील आणि यशोधरानगरातील दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी बंदोबस्त मात्र कायम ठेवला आहे.

हिंसाचाराच्या घटनेनंतर वाढलेल्या तणावामुळे पोलिसांनी शहरातील अकरा पोलिस ठाण्याअंतर्गत संचारबंदी लावली. यात कोतवाली, गणेशपेठ, तहसील, यशोधरानगरानगर, पाचपावली, शांतिनगर, सक्करदरा, इमामवाडा, नंदनवन, कपिलनगर या ठाण्यांचा समावेश होता. गुरुवारी पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात असल्याने नंदनवन आणि कपिलनगर ठाण्या अंतर्गत भागातील संचारबंदी उठविली. मात्र, शुक्रवारी काही वेळ त्यात शिथिलता देत, नऊ ठाण्यांची संचारबंदी कायम ठेवली. शनिवारी पोलिसांनी नऊपैकी पाच ठाण्यातील संचारबंदी उठविण्यात आली.

मात्र, शनिवारी सकाळी इरफान अन्सारीच्या मृत्यूनंतर परिसरात तणाव वाढल्याने पोलिसांनी कोतवाली, गणेशपेठ, तहसील आणि यशोधरानगरातील संचारबंदी कायम ठेवण्याचा निर्णय पोलिस आयुक्तांनी घेतला. रविवारी (ता.२३) दुपारच्या सुमारास पोलिस आयुक्तांनी चारही पोलिस ठाण्यांतर्गत असलेली संचारबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या परिसरातील सर्व दुकाने दुपारी तीन नंतर सुरू करण्यात आली.

पोलिस बंदोबस्त राहणार

पोलिसांनी चारही पोलिस ठाण्यातील संचारबंदी उठविली असली तरी पोलिसांकडून या भागात बंदोबस्त कायम ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, चिटणवीस पार्क आणि इतर काही संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त कायम ठेवण्यात आलेला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.