श्रीवर्धन : हरिहरेश्वर येथे पर्यटनासाठी आलेल्या ठाण्यातील पल्लवी सरोदे (वय ३७) यांचा येथील तीर्थक्षेत्र प्रदक्षिणा ठिकाणी खडकावर सेल्फी घेताना समुद्राच्या लाटांचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. २३) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. पल्लवी सरोदे या ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यक या पदावर कार्यरत होत्या.
हरिहरेश्वर येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ येथे ठाण्यातील नऊ महिलांचा गट सहलीसाठी मुक्कामी आला होता. येथील देवदर्शन झाल्यावर हा गट तीर्थक्षेत्र प्रदक्षिणा येथे छायाचित्र काढण्यासाठी प्रदक्षिणा पायऱ्यांच्या ठिकाणी आला. या वेळी स्थानिकांनी या महिलांना खडकावर भीषण लाटा येत असल्याची कल्पनाही दिली. या ठिकाणी पाच ते आठ फूट उंच लाटा उसळत होत्या. तरी यामध्ये लाटांसोबत सेल्फीच्या नादात पल्लवी राहुल सरोदे या येथील धोकादायक खडकावर गेल्या.
लाटेच्या तडाख्याने त्या खडकावरून समुद्रात पडल्या. या वेळी इतर महिलांची आरडाओरडा ऐकताच येथील स्थानिक बोटिंग व्यावसायिक अक्षय मयेकर व अमर कवडे या दोघांनी खवळलेल्या समुद्रात बोटीच्या साहाय्याने पल्लवी यांचा शोध घेतला. यामध्ये पोटात पाणी गेल्याने पल्लवी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सरोदे यांच्या पश्चात पती, सासू-सासरे आणि मुलगा असा परिवार आहे.