नायगाव : नांदेड जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पी अधिवेशनानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासोबत विशेष बैठक घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले.
नरसी (ता. नायगाव) येथे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी सून डॉ. मीनल पाटील खतगावकर व आपल्या समर्थकांसह रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.
पवार यांनी जिल्ह्यातील लेंडी, मानार आणि कोलंबी (ता. नायगाव) उपसा सिंचन प्रकल्पांसह नरसी-बोधन-मुखेड आणि नांदेड-हैदराबाद रस्त्याच्या चौपदरीकरणासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर भर देण्याची ग्वाही दिली. गोदावरी मनार सहकारी साखर कारखान्याच्या अडचणी सोडवण्यासाठीही लवकरच बैठक घेण्यात येईल, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री नवाब मलिक, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राजू नवघरे आदींसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.