डॉ. वीरेंद्र ताटके - गुंतवणूक विषयाचे अभ्यासक
शेअर बाजारातील घसरणीची आकडेवारी आलेख कागदावर मांडली, तर त्याचा एक पॅटर्न तयार होतो आणि त्या पॅटर्नच्या आकाराच्या मदतीने काही ठोकताळे मांडता येतात. शेअर बाजाराच्या एकंदरीत स्थितीचा अंदाज येण्यासाठी हे ठोकताळे गुंतवणूकदारांना उपयोगी ठरतात. हे पॅटर्न गुंतवणूकदारांच्या प्रश्नांना अचूक उत्तरे देऊ शकत नसले, तरी बाजाराच्या दिशेचा अंदाज घेण्यासाठी नक्कीच मदत करतात. यापैकी काही मुख्य पॅटर्नविषयी जाणून घेऊ या.
व्ही पॅटर्नघसरणीचा हा पॅटर्न गुंतवणूकदारांसाठी सर्वांत कमी त्रासदायक असतो. या पॅटर्नच्या आकाराप्रमाणे त्यात बाजारात तीव्र वेगाने घसरण आणि त्यापाठोपाठ त्याच वेगाने सुधारणा दिसून येते. काही तात्कालिक कारणामुळे बाजारात अशा प्रकारची घसरण दिसून येते. उदा. कोरोना साथीच्या काळात भारतातील शेअर बाजार तीव्र वेगाने घसरला आणि काही महिन्यांतच पुन्हा त्याच वेगाने सावरलासुद्धा! बाजारात त्यावेळी झालेल्या पडझडीची आणि त्यानंतर आलेल्या तेजीच्या आकड्यांची आलेख कागदावर मांडणी केली, तर त्याचा आकार ‘व्ही’ (V) या इंग्रजी अक्षराप्रमाणे होतो. बाजारातील पडझड जेव्हा तात्पुरत्या कारणांमुळे होते तेव्हा अशा आकाराचा आलेख तयार होतो. हा पॅटर्न गुंतवणुकीची सुवर्णसंधी घेऊन येत असतो, फक्त त्याकडे बारकाईने लक्ष ठेवायला हवे.
डब्ल्यू पॅटर्नएकामागून एक असे दोन किंवा अधिक ‘व्ही’ पॅटर्न तयार होत गेले, तर त्याचा आकार डब्ल्यू (W) या इंग्रजी अक्षरासारखा होतो. बाजार एका धक्क्यातून सावरेपर्यंत पुन्हा आणखी एक धक्का बसल्यास त्याची स्थिती अशी होते. येथे बाजार सातत्याने कोसळताना दिसत असला, तरी प्रत्यक्षात वेळोवेळी गुंतवणुकीची संधी निर्माण होत असते. या पॅटर्नमध्ये बाजार जेव्हा तळ गाठतो तेव्हा नेमकी वेळ साधून गुंतवणूक करणे शक्य झाले, तर या पॅटर्नशी दोस्ती करता येते. याउलट बाजाराच्या वरच्या पातळीवर एकदाच गुंतवणूक करून त्यातून फायदा कमविण्याची वाट पाहणाऱ्या गुंतवणूकदारांना मात्र, हा पॅटर्न तापदायक ठरतो. काही वेळा डब्ल्यू या अक्षराच्या अगदी उलट परिस्थिती निर्माण होते, तेव्हा इंग्रजी एम (M) आकाराचा पॅटर्न तयार होतो. या दोन्हीही पॅटर्नकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, तर या परिस्थितीतही आपण गुंतवणुकीच्या संधी साधू शकतो.
एल पॅटर्नबाजारातील मंदीचा सर्वांत त्रासदायक असा हा पॅटर्न आहे. या पॅटर्नमध्ये बाजार वेगाने तळ गाठतो आणि त्यानंतर बराच काळ तिथेच घुटमळत राहतो. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा दीर्घकालीन गंभीर समस्या निर्माण होते, तेव्हा असा पॅटर्न तयार होतो. बेकारी, ग्राहकांची खालावलेली क्रयशक्ती, अकार्यक्षम सरकार यामुळे अर्थव्यवस्था खंगते आणि त्याचे प्रतिबिंब एल पॅटर्नच्या स्वरूपात बघायला मिळते. २००८ मध्ये जेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेने प्रदीर्घ मंदी अनुभवली, तेव्हा शेअर बाजारात असा पॅटर्न तयार झाला होता.
गेल्या वर्षभरात भारतीय शेअर बाजारात वेगाने पडझड पहायला मिळत असली, तरी दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठीचा निर्देशांकाचा आलेख पाहिल्यास परिस्थिती आशादायक वाटते आहे आणि बाजाराचा तो आलेख सद्यस्थितीत नक्कीच ‘एल’ पॅटर्न दर्शवित नाही. त्यामुळे एकंदर परिस्थितीवर नजर ठेवून टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याची ही वेळ आहे. जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांनी म्हणल्याप्रमाणे शेअर बाजारात होणाऱ्या पडझडीकडे आपण शत्रू म्हणून पाहण्याऐवजी मित्र म्हणून पाहिल्यास आपल्याला त्याचा फायदाच होईल.