इशान किशनने शतक ठोकताच कोणाला दिली फ्लाइंग किस? विजयानंतर स्वत:च केला खुलासा
GH News March 24, 2025 07:14 PM

टीम इंडियात कमबॅकसाठी प्रयत्नशील असलेल्या इशान किशनने आपल्या स्वभावाला अनुसरून आयपीएलच्या पहिल्या सामन्यात फलंदाजी केली. इशान किशनने राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांच्या चिंध्या उडवल्या. इशान किशनने 45 चेंडूत शतक पूर्ण केलं. तर या सामन्यात 47 चेंडूत नाबाद 106 धावांची खेळी केली. सनरायझर्स हैदराबादसाठी डेब्यू सामन्यातच इशान किशनने दमदार खेळी केली. आयपीएल स्पर्धेतील त्याचं पहिलं शतक आहे. शतकी खेळीनंतर इशान किशनने स्टँडकडे पाहिलं आणि फ्लाइंग किस दिली. सोशल मीडियावर याबाबत वेगवेगळे दावे केले जात होते. मात्र सामना संपताच इशान किशनने याबाबत खुलासा केला आहे. इशान किशनने सांगितलं की, ‘ फ्लाइंग किस त्या प्रियजनांसाठी होते जे स्टँडवरून खेळ पाहत होते. ज्यांनी गेल्या वर्षी कठीण काळात मला साथ दिली. मी कधीही वाईट क्षणांबद्दल विचार करत नव्हतो. मी काय करायचे आहे यावर लक्ष केंद्रित करायचो. मी नकारात्मक गोष्टींपासून मुक्त झालो. मला वाटले की आयपीएल येत आहे, मला काही चांगल्या गोलंदाजांचा सामना करावा लागेल, मी फक्त माझे कठोर परिश्रम करत होतो.’

इशान किशनने पुढे सांगितलं की, ‘खेळाडूंना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर सर्व काही व्यवस्थित आणि शांत आहे. परंतु पडद्यामागे खूप मेहनत घेतली जात आहे. मला आशिष नेहरासोबत काम करायला खूप मजा येत आहे. हा एक उत्तम संघ आहे, चांगला गोलंदाजी आणि वेग असून अहमदाबादच्या परिस्थितीला अनुकूल असेल.’ इशान किशनसाठी मागचं वर्ष काही खास गेलं नाही. उलट त्याला 2024 या वर्षात त्रास सहन करावा लागला. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेकडे कानाडोळा केल्याने सेंट्रल काँट्रॅक्टमधून वगळण्यात आलं. तर मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीने त्याला रिटेन केलं नाही.

‘सनरायझर्स हैदराबादसाठी पहिला सामना खेळताना खरे सांगायचे तर चिंता होतीच. मी ते नाकारणार नाही. पॅट आणि प्रशिक्षकांनी त्यांनी खेळापूर्वी खूप आत्मविश्वास दिला. वातावरण खूप शांत आणि संयमी आहे, तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला फक्त आत जावे लागेल आणि त्या वेळी जे करायला हवे होते ते स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. मी मधल्या काळात माझा वेळ एन्जॉय केला. मला दरम्यान खूप वेळ मिळाला, मी खूप सराव करत होतो, माझ्या फलंदाजीवरही काम केले. एकंदरीत, तयारी खूप चांगली होती.’, असंही इशान पुढे म्हणाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.