Accidental death : कटफळचा तरुण अपघातात ठार; आई, पत्नी अन् मुलगा जखमी
esakal March 24, 2025 06:45 PM

महूद : मोटार सायकल आणि चारचाकी वाहनाची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये कटफळ येथील धनाजी दुधाळ हा तरुण मृत्युमुखी पडला. त्याची आई, पत्नी व मुलगा असे तिघेजण या अपघातामध्ये जखमी झाले आहेत. हा अपघात रविवार दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मठवस्ती (ता. सांगोला) येथे झाला आहे.

मयत धनाजी लक्ष्मण दुधाळ याचा चुलतभाऊ शिवाजी दुधाळ यांनी सांगोला पोलिसात माहिती दिली आहे. कटफळ (ता. सांगोला) येथील धनाजी लक्ष्मण दुधाळ हे आई, पत्नी व मुलाला घेऊन दवाखान्यातील नातेवाइकांना भेटण्यासाठी एमएच ४५/वाय७४४२ क्रमांकाच्या दुचाकीवरून सांगोल्याकडे निघाले होते.

त्याचवेळी सांगोला ते कटफळ रोडवरील मठवस्ती बागलवाडी येथील रस्त्यावर सांगोल्याहून पळशी (ता. म्हसवड, जि. सातारा) कडे चारचाकी कॅरी वाहन (एमएच ११/डीडी २६३३) निघाले होते. या चार चाकी वाहनाची व मोटारसायकलची धडक झाल्याने या अपघातात मोटरसायकलवरील चौघेही जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी या अपघातामध्ये धनाजी दुधाळ हा उपचारापूर्वीच मयत झाला असल्याचे सांगितले. तर मयताची पत्नी लक्ष्मी, आई केराबाई व मुलगा जखमी झाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.