Ajit Pawar : शिक्षकांच्या प्रश्नांबाबत अधिवेशनानंतर बैठक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शिक्षक संघाला ग्वाही
esakal March 24, 2025 07:45 PM

सांगली : ‘राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर संबंधित सर्व विभागांच्या सचिवांसमवेत बैठक घेऊ,’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.

शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने राज्य नेते संभाजीराव थोरात यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन दिले व चर्चा झाली. यावेळी २०१६ नंतर वरिष्ठ वेतन श्रेणी मिळालेले शिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करणे, खुल्लर समितीने दिलेल्या अहवालानुसार वेतन श्रेणीमध्ये त्रुटी असणाऱ्यांना दोन वेतनवाढी देण्याचा निर्णय अंतिम करावा,

शिक्षकांच्या प्रलंबित बिलांसाठी निधी उपलब्ध करून देणे, आश्वासित प्रगत योजना लागू करणे, विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करणे, नगरपालिका व महापालिका क्षेत्रातील शिक्षकांचे संपूर्ण वेतन करण्यासाठी शासनाकडून अनुदान देणे, जिल्ह्यांतर्गत व आंतरजिल्हा बदली शासन आदेशामध्ये एकसूत्रीपणा आणणे, या विषयांवर चर्चा झाली.

सर्वच विषयांबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर शालेय शिक्षण, ग्रामविकास, नगरविकास, अर्थ अशा संबंधित सर्वच विभागाच्या सचिवांसमवेत शिक्षक संघाची बैठक लावू व शिक्षकांचे प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले असल्याची माहिती राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.

यावेळी सांगलीचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, सांगलीचे सरचिटणीस अविनाश गुरव, कोल्हापूरचे रवी पाटील, सुनील पाटील यांच्यासह शिक्षक संघाचे राष्ट्रीय व राज्य पदाधिकारी उपस्थित होते.

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींनुसार ज्या शिक्षकांच्या वेतनामध्ये त्रुटी निर्माण झाली आहे, त्यांच्यासाठी नेमलेल्या खुल्लर समितीचा अहवाल अनुकूल किंवा प्रतिकूल पाहावा किंवा शासनाने त्यांच्या अधिकारांमध्ये वेतनश्रेणीमध्ये तोटा झालेल्या शिक्षकांना दोन वेतनवाढी द्याव्यात.

- बाळासाहेब मारणे, राज्याध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.