बीसीसीआयने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या वार्षिक कराराची घोषणा केली आहे. बीसीसीआयने कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मंधाना आणि ऑलराउंडर दीप्ती शर्मा या तिघांचा ए ग्रेडमध्ये समावेश केला आहे. तर 5 खेळाडूंचा पहिल्यांदाच वार्षिक करारात समावेश करण्यात आला आहे. मात्र बीसीसीआयने 6 खेळाडूंना झटका दिला आहे. बीसीसीआयने 6 खेळाडूंना वार्षिक करारातून वगळलं आहे. या 6 खेळाडूंमध्ये मेघना सिंह, देविका वैद्य, एस मेघना, अंजली सरवानी, हर्लिन देओल आणि राजेश्वरी गायकवाड यांचा समावेश आहे.
कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मंधाना आणि दीप्ती शर्मा या तिघींना प्रत्येकी ए ग्रेडनुसार बीसीसीआयकडून वार्षिक 50 लाख रुपये मिळणार आहेत. तर बी ग्रेडमध्ये रेणुका सिंह, ऑलराउंडर जेमिमाह रॉड्रिग्स, विकेटकीपर रिचा घोष आणि ओपनर शफाली वर्मा या चौघी आहेत. या चौघींना प्रत्येकी 30 लाख रुपये मिळणार आहेत.
बीसीसीआयने काही खेळाडूंना जसं वगळलंय, तसंच काही खेळाडूंचा पहिल्यांदाच वार्षिक करारात समावेशही केला आहे. ऑफ स्पिनर श्रेयांका पाटील, वेगवान गोलंदाज तितास साधु, अरुंधति रेड्डी, ऑलराउंडर अमनज्योत कौर आणि विकेटकीपर उमा चेत्री यांना सी ग्रेडमध्ये स्थान देण्यात आलं आहे. यांच्यासह यास्तिका भाटीया, राधा यादव, स्नेह राणा आणि पूजा वस्त्राकर यांचाही सी ग्रेडमध्ये समावेश करण्यात आलाय. या सी ग्रेडमधील खेळाडूंना वार्षिक 10 लाख रुपये मिळणार आहेत.
तसेच खेळाडूंना वार्षिक कराराव्यतिरिक्त प्रत्येक सामन्यासाठी मानधन मिळतं. भारतीय महिला क्रिकेटपटूंना कसोटी सामन्यासाठी 15, एकदिवसीय सामन्यासाठी 6 तर टी 20I सामन्यासाठी 3 लाख रुपये दिले जातात.
बीसीसीआयकडून वार्षिक करार जाहीर, 6 जणांना डच्चू
दरम्यान येत्या काही दिवसांत भारतीय पुरुष संघाच्या वार्षिक कराराची घोषणा केली जाणार आहे. बीसीसीआयकडून पुरुष संघातील खेळाडूंना महिला खेळाडूंच्या तुलनेत अधिक रक्कम दिली जाते. ए प्लस ग्रेड खेळाडूंना 7, ए ग्रेड खेळाडूंना 5, ग्रेड बी खेळाडूंना 3 आणि डी ग्रेड खेळाडूंना वार्षिक 1 कोटी रुपये दिले जातात.