पुणे : सदाशिव पेठ शिवाजीनगर भागामध्ये पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी १२०० मिमी व्यासाची दांडेकर पूल येथे फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. रात्रीच्या वेळी ही जलवाहिनी फुटल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसात पुन्हा एकदा जलवाहिनी फुटली आहे.
पर्वती जलकेंद्रातून सदाशिव पेठ, शिवाजीनगर भागातील डेक्कन, आपटे रस्ता, गोखले रस्ता, जंगली महाराज रस्ता, माॅडेल काॅलनी आदी भागाला १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून पाणी पुरवठा होतो. दांडेकर पुलावरून स्वारगेट कडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री साडेनऊच्या सुमारास ही जलवाहिनी फुटल्याने अचानक रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहण्यास सुरूवात झाली. पाण्याच्या प्रवाहामुळे रस्ता उखडला.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. हे वेगाने वाहनारे पाणी वस्तीमध्ये घुसल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. दोन दिवसापूर्वीच याच भागात दुसरी एक जलवाहिनी फुटली होती. त्याचे दुरुस्तीचे काम सुरू असतानाच आता ही जलवाहिनी फुटली आहे. जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच पर्वती जलकेंद्रातून पाणी बंद करण्यात आले. तरीही बराच काळ रस्त्यावरून पाणी वाहत होते.
पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप म्हणाले, दांडेकर पूल येथे जलवाहिनी फुटली आहे. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी जलवाहिनी फुटली होती. पाण्याचा दाब योग्य असूनही जलवाहिनी का फुटत आहे याचा शोध घेतला जाईल. या घटनेमुळे सदाशिव पेठ, शिवाजीनगर परिसरातील पाणी पुरवठा विस्कळित होणार आहे. युद्धपातळीवर काम करून उद्या सकाळपर्यंत जलवाहिनी दुरुस्त करू.