इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील चौथा सामना अत्यंत रोमांचक झाला. विशाखापट्टणमला शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सला एका विकेटने पराभूत केले. यासह दिल्लीने अक्षर पटेलच्या नेतृत्वात विजयाने सुरुवात केली आहे. रिषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या लखनौला मात्र शेवटच्या क्षणी पराभवाचा धक्का बसला.
या सामन्यात लखनौने विजयासाठी २१० धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग दिल्लीने १९.३ षटकात ९ विकेट्स गमावत पूर्ण केला.
दिल्लीकडून ७ व्या क्रमांकावर इम्पॅक्ट सब्स्टिट्यूट म्हणून उतरलेल्या आशुतोष शर्मा तोबडतोड फलंदाजीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. वरची फळी कोसळली असताना आणि दिल्लीच्या समोर पराभव दिसत असताना त्याने अक्षरश: विजयश्री खेचून आणली.
दिल्लीकडून जॅक फ्रेझर-मॅकगर्क आणि फाफ डू प्लेसिस हे दोघे सलामीला फलंदाजीसाठी उतरले. पण पहिल्याच षटकात शार्दुल ठाकूरने शानदार गोलंदाजी करताना आधी फ्रेझर-मॅकगर्कचा अडथळा दूर केला आणि मग तिसऱ्या क्रमांकावर उतरलेल्या यष्टीरक्षक फलंदाज अभिषेक पोरेलला शून्यावर माघारी धाडले.
पुढच्याच षटकात एम सिद्धार्थने समीर रिझवीलही ४ धावांवर बाद केले. त्यामुळे ७ धावात ३ विकेट्स अशी बिकट अवस्था दिल्लीची झाली होती.
पण नंतर फाफ डू प्लेसिसला कर्णधार अक्षर पटेलची साथ मिळाली. या दोघांनी आक्रमक शॉट्स खेळताना डाव सावरला होता. पण सहाव्या षटकात अक्षरला दिग्वेश राठीने बाद केले. अक्षरने ११ चेंडूत २२ धावा केल्या. पुढच्याच षटकात रवी बिश्नोईने फाफ डू प्लेसिसचा अडथळा दूर केला. डू प्लेसिस १८ चेंडूत २९ धावा करून डेव्हिड मिलरकडे झेल देत बाद धाला.
तरी नंतर ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्मा यांनी चांगला खेळ करत संघाला १३ षटकांच्या आत ११० धावा पार करून दिल्या होत्या. त्यामुळे दिल्लीच्या आशा उंचावलेल्या होत्या. परंतु, स्टब्सला एम सिद्धार्थने २२ चेंडूत ३४ धावांवर त्रिफळाचीत करत माघारी धाडले.
पण तरी आशुतोषला विपराज निगमने भक्कम साथ दिली. त्यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला १६० धावांचा टप्पा पार करून दिला. त्यामुळे दिल्लीसाठी विजय जवळ येत होता. पण याचवेळी १७ व्या षटकात विपराजला दिग्वेश राठीने एम सिद्धार्थच्या हातून झेलबाद केले आणि लखनौला सामन्यात पुनरागमन करून दिले. विपराजने १५ चेंडूत ३९ धावांची खेळी केली.
त्याच्यानंतर मिचेल स्टार्कही २ धावांवर बाद झाला. पण आशुतोष शर्मा खेळपट्टीवर टिकून होता, त्याने आक्रमक खेळ करत दिल्लीच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. त्याला कुलदीप साथ देत होता. १० चेंडूत १८ धावांची गरज होती. पण त्याचवेळी कुलदीप यादव धावबाद झाला. तरी आशुतोषने लढा कायम ठेवला होता.
शेवटच्या षटकात ६ धावांची गरज होती. लखनौला एकच विकेट हवी होती. मात्र मोहितने शर्माने कसेबसे २ चेंडू खेळले, ज्यामुळे आशुतोष स्ट्राईकवर आला आणि त्याने षटकार खेचत अखेर दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आशुतोष ३१ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ६६ धावा करून नाबाद राहिला.
लखनौकडून शार्दुल ठाकूर, एम सिद्धार्थ, दिग्वेश राठी आणि रवी बिश्नोई या चौघांनीही प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
तत्पुर्वी, दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून लखनौला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. लखनौनेही प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद २०९ धावांचा डोंगर उभा केला. लखनौकडून मिचेल मार्शने ३६ चेंडूत ७२ धावांची आणि निकोलस पूरनने ३० चेंडूत ७५ धावांची ताबतडोत फलंदाजी केली. या दोघांनी मिळूनच १२ चौकार आणि १३ षटकार ठोकले.
त्यांच्याशिवाय डेव्हिड मिलरने अखेरीस आक्रमक खेळत १९ चेंडूत २७ धावा केल्या. एडन मार्करमने १५ धावा केल्या. पण चारही परदेशी खेळाडूंव्यतिरिक्त एकाही खेळाडूला दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही. रिषभ पंतही शून्यावर माघारी परतला होता.
दिल्लीकडून मिचेल मार्शने ३ विकेट्स घेतल्या, तर कुलदीप यादवने २ विकेट्स घेतल्या. विपराज निगम आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.