पुणे, ता. २५ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), मुंबई विद्यापीठ आणि इंग्लंडमधील ‘द ऑनरेबल सोसायटी ऑफ ग्रेज इन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जागतिक दृष्टिकोन : न्याय, समता आणि लोकशाहीचा पुनर्विचार’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे ‘ग्रेज इन’ सोसायटीत आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे यांनी दिली.
वारे म्हणाले, ‘‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील शिक्षण प्रवासाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. ‘ग्रेज इन’मधून त्यांनी ‘बार-ऑॅट-लॉ’ ही पदवी मिळवली. तसेच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी पीएच.डी. पूर्ण केली. या ऐतिहासिक टप्प्याचे स्मरण करण्यासाठी २४ आणि २५ एप्रिलला या परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेत डॉ. आंबेडकर यांचे जागतिक विचारवंत म्हणून योगदान, ब्रिटिश शिक्षणाचा त्यांच्या सुधारक दृष्टिकोनावर झालेला प्रभाव, यावर चर्चा होईल.
‘‘डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक न्याय व आर्थिक समतेसाठीच्या चळवळीवरील प्रभावाची आजच्या संदर्भात पुन्हा समीक्षा, तसेच त्यांच्या विचारधारेच्या आधुनिक समाजातील उपयुक्ततेवर प्रकाश टाकण्याचा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. ही आंतरराष्ट्रीय परिषद डॉ. आंबेडकर यांच्या बौद्धिक आणि सामाजिक वारसाला जागतिक स्तरावर अधोरेखित करत, न्याय आणि समतेच्या चळवळींना एक नवी दिशा देईल,’’ असे वारे यांनी सांगितले.