नवी दिल्ली - बोफोर्स गैरव्यवहाराचा सूत्रधार ओतावियो क्वात्रोची याच्यासोबतच्या गांधी कुटुंबीयांच्या संबंधाचा जोपर्यंत पूर्णपणे खुलासा होत नाही, तोपर्यंत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. बोफोर्स प्रकरणाच्या अनुषंगाने प्रकाशित करण्यात आलेल्या एका पुस्तकाचा संदर्भ भाटिया यांनी यावेळी दिला.
‘क्वात्रोची याचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी तसेच सोनिया गांधी यांच्यासोबत घनिष्ठ संबंध होते. या संबंधाचा फायदा उठवत क्वात्रोची याने संरक्षण क्षेत्राशी संबंधित कंत्राटे मिळविली होती,’ असे ‘बोफोर्स गेट’ नावाच्या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. ‘बोफोर्स’प्रकरणात क्वाचोत्री याने लाच दिल्याचा आरोप सर्वप्रथम १९८७ साली स्वीडिश स्टेट रेडिओने केला होता.
‘सीबीआय’कडून दीर्घकाळ या प्रकरणाचा तपास करण्यात आला होता. ‘क्वात्रोची याचे राजीव गांधी यांच्याशी निकटचे संबंध असल्याचे तसेच बोफोर्स गैरव्यवहाराचा तोच सूत्रधार असल्याचे इटलीच्या तत्कालीन राजदूतांनी सांगितले होते. दुसरीकडे, बोफोर्स तोफांच्या मूल्यांकनात गंभीर त्रुटी असल्याचे ‘कॅग’ने स्पष्ट केले होते,’ असे भाटिया यांनी नमूद केले.
खासगी शोधकर्ता मायकल हॅशमन याच्याकडून बोफोर्स प्रकरणाची माहिती मिळावी, याकरिता सीबीआयने चालू महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेला न्यायिक विनंती केली होती. बोफोर्सच्या संदर्भात महत्त्वाची माहिती द्यायची इच्छा असल्याचे हॅशमॅन याने सांगितले होते.
‘काँग्रेसने तपासात अडथळे आणले’
‘फेअरफॅक्स’ समूहाचा प्रमुख असलेल्या हॅशमॅनने काही वर्षांपूर्वी भारताचा दौरा केला होता. बोफोर्स गैरव्यवहारासंदर्भात सुरू असलेली तपासाची गाडी तत्कालीन काँग्रेस सरकारने रुळावरून खाली आणल्याचे हॅशमॅन याने त्यावेळी सांगितले होते. दरम्यान, सोनिया गांधी यांच्या निर्देशावरूनच क्वात्रोची याची गोठविण्यात आलेली बॅंक खाती ‘सीबीआय’ने पुन्हा खुली केल्याचा आरोप भाटिया यांनी केला आहे.