शिरूर - आपल्या मित्राकडे खुन्नसने बघितल्याच्या रागातून अल्पवयीन तरूणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून तीन दूचाकींवरून पळून गेलेल्या सातजणांच्या टोळक्याला पुणे ग्रामीणची स्थानिक गुन्हे शाखा आणि रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी केज (जि. बीड) जवळ पाठलाग करून पकडले.
रविवारी (ता. २३) रात्री कारेगाव (ता. शिरूर) येथील एका सोसायटीसमोर त्यांनी केलेल्या हल्ल्यात सौरभ श्रीराम राठोड (वय १७, रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे, मुळ रा. शिवाजीनगर, ता. गंगाखेड, जि. परभणी) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार चालू आहेत.
शंकर जालिंदर करंजकर (रा. कळंब, ता. कळंब, जि. धाराशीव), ओम दत्ता चव्हाण (धानोरा, ता. करंजा, जि. वाशिम), रोहन रघुनाथ बोटे (भानगाव, ता. श्रीगोंदे, जि. अहिल्यानगर), ओंकार विजय देशमुख (डोनवाडा, ता. वसमत, जि. हिंगोली), गिरीश गोविंद कऱ्हाळे (हिवरा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली), गोरख विठ्ठल मोरे (कृष्णानगर, ता. मुखेड, जि. नांदेड) व हर्षल सुरेश पारवे (रा. शिवानी, ता. शेणगाव, जि. हिंगोली) अशी अटक करण्यात आलेल्या हल्लेखोरांची नावे असून, हे सर्वजण सध्या कारेगाव (ता. शिरूर, जि. पुणे) येथे वास्तव्यास होते. शिरूर न्यायालयाने त्यांना शनिवार (ता. २८) पर्यंत पोलिस कोठडी दिली. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेतले असून, त्याला येरवडा येथील बालन्यायालयासमोर हजर करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कारेगाव येथील प्लेटोर सोसायटीसमोर रविवारी रात्री नऊच्या सुमारास हल्लेखोरांनी सौरभ राठोड याला अडविले. 'तु आमचा मित्र ओंकार देशमुख याला खुन्नस देऊन का बघितले, तुला माहित आहे का ओंकार कोण आहे, थांब तुला जीवंतच सोडत नाही', असे म्हणत कोयत्याने हल्ला केला. काहींनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
त्यात पोटावर, पाठीवर, डोक्यावर कोयत्याचे वार झाल्याने सौरभ गंभीर जखमी झाला. यश राजू धनवटे (रा. रामपूर, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून काल रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी जीवघेण्या हल्ल्याचा गुन्हा दाखल केला होता.
या कोयता हल्ल्याची व झुंडशाहीची गंभीर दखल घेत पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे वेगाने फिरविली.
गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या व तांत्रिक माहितीच्या आधारे रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक चव्हाण, उपनिरीक्षक निळकंठ तिडके, उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहायक फौजदार दत्तात्रेय शिंदे, उमेश कुतवळ, योगेश गुंड, प्रविण पिठले, विजय सरजिने, विलास आंबेकर, अभिमान कोळेकर, माऊली शिंदे, रामेश्वर आव्हाड तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव यांनी केजजवळ दोन्ही बाजूंनी नाकेबंदी करीत तीन दूचाकींवरून पळून जात असलेल्या सात हल्लेखोरांना पाठलाग करून जेरबंद केले. केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांनीही याकामी सहाय्य केले.