Harshwardhan Sapkal : 'महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का?' हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल; दंगेखोरांकडून भरपाई वसूल करावी
esakal March 26, 2025 12:45 PM

मुंबई : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने त्यांच्या कार्यक्रमात कोणाचेही नाव घेतले नाही तरीही ‘चोराच्या मनात चांदणे’ या म्हणीप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी ती टीका स्वतःवर ओढवून घेऊन तोडफोड केली. त्यांचा सरकार, घटना, कायदा व गृहविभागावर विश्वास नाही का?, त्यांनी कायदा हातात का घेतला,’’ असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.

एका स्वातंत्र्यसैनिकाच्या स्टुडिओची तोडफोड केल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे सेनेकडून नुकसान भरपाई वसूल करावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे. गांधी भवन येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी कुणाल कामरा प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीचा निषेध केला.

‘‘नागपूरच्या दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तशीच वसुली एकनाथ शिंदे व त्यांच्या दंगेखोरांकडून सरकार वसूल करणार का, याचे उत्तर द्यावे. नागपूर दंगलीतील आरोपी फहीम खानच्या घरावर सरकारने बुलडोझर चालवला. मंत्री नीतेश राणे यांनी चिथावणीखोर, प्रक्षोभक विधाने केली आहे.त मग फडणवीस नीतेश राणेंच्या घरावर बुलडोझर चालवणार का,’’ असा प्रश्न सपकाळ यांनी विचारला आहे.

‘सत्ताधारी कायदा सुव्यवस्था बिघडवतात’

राज्याची कायदा सुव्यवस्था सत्ताधारी पक्ष बिघडवित असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे समर्थन करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या सोलापूरकर, कोरटकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया सत्ताधारी देत नाहीत. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप दानवे यांनी केला. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केलेल्या गाण्याचे तीव्र पडसाद आज विधानपरिषदेतही उमटले.

या प्रकरणावर विरोधी पक्ष सत्ताधारी सदस्य आक्रमक झाले यामुळे कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले. कुणाल कामराचा स्टुडिओ पोलिसांच्या समक्ष फोडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज स्थगन प्रस्ताव मांडून केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.