पाचवा सामन्याआधीच पाकिस्तानने मालिका गमावली होती. पण शेवटचा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्नही फसला. त्यामुळे पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 4-1 ने मात खावी लागली. नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या आघाडीच्या फलंदाजांनी अक्षरश: माती खाल्ली. मोहम्मद हारीस, हसन नवाज आणि ओमैर युसूफ यांच्या विकेट स्वस्तात गेल्या. तर उस्मान खान आणि अब्दुल समदही स्वस्तात बाद झाले. कर्णधार सलमान आगाने एकहाती सामना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्याने 39 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकार मारत 51 धावा केल्या. तर शादाब खानने 28 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त शेपटच्या फलंदाजांनी मैदानात आले आणि हजेरी लावून गेले. पाकिस्तानने 20 षटकात 9 गडी गमवून 128 धावा केल्या आणि विजयासाठी 129 धावांचं आव्हान दिलं.
पाकिस्तानने विजयासाठी दिलेलं आव्हान न्यूझीलंडने 2 गडी गमवून फक्त 10 षटकात पूर्ण केलं. टिम साइफर्टने पाकिस्तानच्या गोलंदाजांना अक्षरश: झोडला. साइफर्टने 38 चेंडूत 10 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 97 धावांची खेळी केली. त्याचं शतक फक्त 3 धावांनी हुकलं. तर फिन एलन 27 आणि मार्क चॅपमन हा 3 धावा करून बाद झाला. पाकिस्तानच्या पराभवानंतरही कर्णधार सलमान आगाचा भलताच तोरा होता. सामन्यानंतर म्हणाला की, ‘ते उत्कृष्ट होते. त्यांनी संपूर्ण मालिकेत आम्हाला मागे टाकले. पण त्यात बरेच सकारात्मक पैलू होते. ऑकलंडमध्ये हसन आणि रिसने ज्या पद्धतीने फलंदाजी केली. तर सुफियानने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली. जेव्हा आम्ही येथे आलो तेव्हा आमचे लक्ष आशिया कप आणि विश्वचषकावर होते. मी चांगली कामगिरी केली. तुम्ही मालिका गमावली तरी काही फरक पडत नाही. एकदिवसीय सामन्यांमध्ये पूर्णपणे वेगळी टीम आहे. ‘
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन: मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), टिम सेफर्ट, फिन अॅलन, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिशेल हे (विकेटकीपर), ईश सोधी, जेकब डफी, बेन सियर्स आणि विल्यम ओरुर्क.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : मोहम्मद हरिस (विकेटकीपर), हसन नवाज, सलमान आघा (कर्णधार), ओमैर युसूफ, उस्मान खान, शादाब खान, अब्दुल समद, जहांदाद खान, हरिस रौफ, सुफियान मुकीम आणि मोहम्मद अली.