आयपीएल 2025 स्पर्धेत पंजाब किंग्सने विजयाने सुरुवात केली आहे. मागच्या काही पर्वात पंजाब किंग्सचं जेतेपदाचं स्वप्न काही पूर्ण झालेलं नाही. फक्त एकदा अंतिम फेरी गाठली आहे. तर एकदा प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं होतं. या व्यतिरिक्त कायम साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाकडून फार अपेक्षा आहेत. पंजाब किंग्सने पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा 11 धावांनी पराभव केला. खरं तर विजयासाठी दिलेल्या 243 धावा रोखणं मोठं आव्हान होतं. कारण दुसऱ्या डावात दव पडल्याने गोलंदाजी करणं कठीण होतं आणि सामन्यावरची पकड सैल होते. पण गुजरात टायटन्सने हा सामना कुठे गमावला? माहिती आहे का? नसेल तर त्याबाबत जाणून घ्या. जोस बटलर फलंदाजी करेपर्यंत सामना गुजरातच्या पारड्यात होता. 14 व्या षटकापर्यंत सर्वकाही ठीक होतं. पण नंतर सामना फिरला.
श्रेयस अय्यरने विजय कुमार वैशाखच्या हाती 15वं षटक सोपवलं. वैशाखने या षटकात फक्त पाच धावा दिल्या. या षटकापासून गुजरात टायटन्सवर दबाव वाढत गेला. श्रेयसने पुन्हा एकदा 17वं षटक वैशाखच्या हाती सोपवलं आणि त्यातही फक्त 5 धावा आल्या. त्यामुळे जोस बटलर आणि रूदरफोर्ड पूर्णपणे दडपणाखाली आले. ही टेन्शन कमी करण्याच्या नादात जोस बटलरची 18 व्या षटकात विकेट गेली. ही विकेट मार्को यानसेनला मिळाली पण याचं श्रेय वैशाखला जातं. कारण त्याआधी त्याने केलेल्या दोन षटकांमुळे गुजरातचा संघ बॅकफूटवर गेला होता.
स्थिती नाजूक असताना 19वं षटक वैशाखने दडपण असूनही व्यवस्थित टाकलं. आरपारच्या लढाईत असलेल्या खेळाडूंपासून चेंडू वाइड यॉर्कर ठेवला. त्यामुळे फटकेबाजी करणं कठीण होत होतं. पण 18 आल्या. दुसरीकडे, शेवटच्या षटकासाठी 27 धावा ठेवल्या. शशांक सिंहने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत श्रेयसच्या या निर्णयाचं कौतुक केलं. ‘श्रेयस वैशाखला आणलं आणि मला वाटते हीच योग्य वेळ होती. त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली. तशी आम्ही व्यूहरचना आखली होती. खरंच एक चांगला निर्णय होता. त्याने दडपण असताना गोलंदाजी केली. दवही पडलं होतं. मला क्षेत्ररक्षण करताना हे जाणवलं.’ , असं शशांक सिंह म्हणाला.