- अश्विनी आपटे- खुर्जेकर, व्यक्तिमत्त्वविषयक सल्लागार
काही बोलायला गेलं तरी गैरसमज होतो, कसं समजावून सांगायचं ते कळतच नाही, सांगितलेलं लक्षात राहत नाही, नक्की कसं समजवायचं होतं तेच कळलं नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल तर याचा अर्थ तुमच्या संवादकौशल्यामध्ये ‘सक्रिय ऐकण्या’चा (ॲक्टिव्ह लिसनिंग) समावेश करण्याची गरज आहे.
मैत्रिणींनो, आपल्याला बरेचदा जाणवते, की आपल्या बोलण्याकडे समोरच्याचे लक्ष नाही, आपल्या बोलण्याला महत्त्व नाही, संवाद साधण्याची समोरच्याची इच्छाच नाही; पण खरे बघता आपल्याला अशी भावना समोरची व्यक्ती आपले बोलणे सक्रियपणे ऐकत नसल्यामुळे येते. याचे कारण म्हणजे आपल्याला संवादामध्ये केवळ बोलणे महत्त्वाचे वाटते; परंतु प्रत्यक्षात बोलण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीचे बोलणे लक्ष देऊन मनापासून आणि समजून घेण्यासाठी ऐकणे जास्त महत्त्वाचे आहे
मैत्रिणींनो, आपण जेवढा वेळ जागे असतो, त्यातला नव्वद टक्के वेळ आपण कुठल्या ना कुठल्या प्रकारे संवाद करत असतो. बोलणे, ऐकणे, लिहिणे, वाचणे, टीव्ही बघणे, फोनवर बोलणे, अगदी स्वतःच्या मनातले विचार हासुद्धा एक संवादाचा प्रकार आहे. संवादामधला एकूण ४५ टक्के वेळ आपण ऐकण्यात, ३० टक्के बोलण्यात, १६ टक्के वाचण्यात आणि ९ टक्के लिहिण्यात घालवतो. प्रभावी संवाद साधण्यासाठी, बोलण्यापेक्षा, ऐकण्याला जास्त महत्त्व आहे.
सक्रिय ऐकणे ही केवळ ऐकण्याची प्रक्रिया नसून, संवादकौशल्य आहे असे म्हणायला हरकत नाही. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर लक्ष केंद्रित करतो, त्याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करतो आणि योग्य प्रतिसाद देतो. त्याचबरोबर आपल्या शारीरिक हालचाली, हावभाव आणि समर्पक प्रश्नांनी योग्य प्रतिसाद देतो आणि आपला संवादामधला समावेश दाखवतो, त्याला ‘सक्रिय ऐकणे’ असे म्हटले जाते.
या गोष्टी करा
1) संवाद साधताना मोबाईल, टीव्ही किंवा इतर गोष्टी बाजूला ठेवा आणि समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याकडे लक्ष केंद्रित करा.
2) समोरची व्यक्ती बोलत असताना मध्येच अडवू नका. त्याच्या बोलण्यावर लगेच मत न मांडता, त्यांचे म्हणणे पूर्ण ऐकून घ्या.
3) समोरच्या व्यक्तीचे बोलणे समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या हावभाव आणि देहबोलीमधून प्रतिसाद द्या.
4) गैरसमज टाळण्यासाठी आणि संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी, योग्य प्रश्न विचारून संवाद पुढे न्या. हे प्रश्न निष्कर्ष काढण्यासाठी विचारू नका.
योग्य संवाद साधण्यासाठी स्पष्ट बोलणे महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे सक्रिय ऐकणेही महत्त्वाचे आहे. संपूर्ण लक्ष देऊन ऐकल्याने गैरसमज कमी होतात, संवादामधली आणि पर्यायी नातेसंबंधांमधली पारदर्शकता वाढते.
मैत्रिणींनो आपण सगळ्यांनीच अनुभवलेय, चुकीचे ऐकल्यामुळे संभाषणाचा अर्थ बदलला आणि नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण झाला. अर्धवट किंवा चुकीची माहिती मिळाल्याने काही निर्णय चुकले. संभाषण स्पष्टपणे न समजल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आणि गैरसमज वाढला, वगैरे वगैरे.
हे सर्व टाळण्यासाठी लक्षपूर्वक, मन लावून आणि संपूर्ण लक्ष केंद्रित करून संवाद साधणे आवश्यक आहे. सक्रिय ऐकणे हे महत्त्वपूर्ण जीवनकौशल्यही आहे. त्यामुळे पुढच्या वेळी कोणीतरी आपल्याशी बोलत असेल, तेव्हा फक्त कानाने नाही, तर मनानेही ऐकण्याचा प्रयत्न करा!