महाराष्ट्राच्या जिगरबाज पॅरा खेळाडूंनी खेलो इंडिया स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी टेबलटेनिसमध्ये पदकाचा षटकार झळकावला. स्पर्धेत 18 सुवर्णांसह 43 पदकांची लयलूट करीत महाराष्ट्राने पदकतक्यात पाचवे स्थान पटकावले.
कोल्हापूरच्या दत्तप्रसाद चौगुले व विश्व तांबे सुवर्णपदकाला गवसणी देत राज्यासाठी स्पर्धेत सुवर्णसांगता केली.
इंदिरा गांधी क्रीडा संकुलात संपलेल्या टेबलटेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या पॅरा क्रीडापटूंनी 3 सुवर्ण, 3 कांस्य पदकांची कमाई करीत दिवस गाजविला. मुंबईच्या रिशित नथवानी, कोल्हापूरचे दत्तप्रसाद चौगुले व विश्व तांबेने सुवर्णपदकाचा करिश्मा घडविला.
विवेक मोरे, वैष्णवी सुतार व पृथ्वी बर्वे यांनी कांस्य पदकांची कमाई केली. दत्तप्रसाद, विश्वने सलग दुसर्यांदा सोनेरी यशाचा पल्ला पार केला. टेबलटेनिसमध्ये सर्वसाधारण विजेतेपदाचा मानही महाराष्ट्राने पटकविला.
दिल्लीतील पॅरा खेलो इंडियाच्या दुसर्या पर्वात महाराष्ट्राने गत वर्षापेक्षा सरस कामगिरी केली. यंदा 18 सुवर्ण, 13 रौप्य व 12 कांस्य अशी एकूण 43 पदके महाराष्ट्राच्या नावापुढे झळकली. गतस्पर्धेत 12 सुवर्णांसह 35 पदके महाराष्ट्राने जिंकली होती.
यंदा अॅथलेटिक्समध्ये सर्वाधिक 23, बॅडमिंटनमध्ये 4, नेमबाजीत 3, अर्चरीत 2, पॉवरलिफ्टिंगमध्ये 5, टेबलटेनिसमध्ये 6 अशी एकूण 43 पदकांचा लयलूट केली आहे. हरियाणाने 104 पदके जिंकून सर्वसाधारण विजेतेपदाचा मान संपादन केला.
अपेक्षेप्रमाणे टेबलटेनिस प्रकारात महाराष्ट्राच्या क्रीडपटूंनी सोने लुटले. मुंबईच्या रिशित नथवानीने पुरूषांच्या सी 5 प्रकारात संयमी खेळाचे प्रदर्शन घडवित अंतिम फेरीत उत्तरप्रदेशच्या अभिषेक कुमार सिंगला 11-7,11-6,11-6 असे एकतर्फी 3-0 गेमने पराभूत केले.
रिशितने खेलो इंडिया स्पर्धेत प्रथमच सुवर्ण पदक जिंकले आहे. 2017 मध्ये कबड्डी खेळताना दुखापतीत त्याला अर्धांगवायूने ग्रासले. पायाची हालचाल थांबल्याने त्याला व्हिलचेअरचा आधार घ्यावा लागला. आईं विधी नथवानी यांनी टेबलटेनिससाठी प्रेरीत केल्यामुळे तो आता चॅम्पियन पॅरा खेळाडू म्हणून नावरूपाला आला आहे.
कोल्हापूरच्या शेतकरी कुटुंबातील दत्तप्रसाद चौगुलेने सी 9 प्रकारात हरियाणाच्या रविंद्र यादवला 3-0 गेमने पराभूत करून आपली हुकूमत गाजवली. त्याने 11-4,11-5,11-5 गुणांनी नमवित सलग दुसर्या वर्षी खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्ण पदकाचा पराक्रम केला.
27 वर्षींय दत्तप्रसाद उजव्या हाताने अधू असून तो बंगलोरमध्ये दिनेश जय बालकृष्णन यांच्या अॅकॅडमीत सराव करीत असतो. गेली 4 वर्ष दिनेश सरांनी माझी प्रशिक्षणासह सर्व आर्थिक जबाबदारी पेलल्यामुळे मी हे यश मिळवू शकलो असे सांगून दत्तप्रसाद पुढे म्हणाला की, पॅरा आशियाई व पॅरालिम्पिकसाठी मी घाम गाळत आहे. सध्या तो देशातील क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजवान आहे.
कोल्हापूरचा हरहुन्नरी खेळाडू विश्व तांबे महाराष्ट्रासाठी सुवर्णपदकाची सांगता केली. पुरूषांच्या सी 10 प्रकारात हरियानाच्या जगन्नाथ मुखर्जीला विश्वने 11-9,11-8,11-4 गुणांनी नमवले. इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असलेल्या विश्व स्पर्धेत आपले वर्चस्व पहिल्या लढतीपासून प्रस्थापित केले होते. उजवा पाय लहान असलेला विश्वने आंतराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
कोल्हापूरचे सुवर्णमय वर्चस्व, पदकाचा चौकारखेलो इंडिया स्पर्धेत नेमबाजी, अॅथलेटिक्स पाठोपाठ टेबलटेनिस स्पर्धेत कोल्हापूरच्या खेळाडूंचा डंका वाजला. टेबलटेनिसमध्ये दत्तप्रसाद चौगुले व विश्व तांबे सुवर्ण तर वैष्णवी सुतार, विवेक मोरे यांनी कांस्य पदकांची कमाई करीत दिल्ली गाजवली. हे तिन्ही खेळाडू कोल्हापूरातील शाहू स्टेडियममध्ये सराव करून राष्ट्रीय स्तरावर आपल्या यशाचा झेंडा फडकविला आहे.