संपूर्ण जगावर टॅरिफ लावतो, बघतो काय होतंय, डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ
Marathi March 31, 2025 10:24 PM

डोनाल्ड ट्रम्प न्यूयॉर्क: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगावर टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा एअर फोर्स वन मध्ये पत्रकारांसोबत चर्चा करताना केली. त्यांनी म्हटलं की येत्या काळात सर्व देशांवर टॅरिफ लावणार आहोत.

अमेरिकेनं आतापर्यंत जे देश त्यांच्यावर टॅरिफ लावतात त्यांच्यावर टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. अमेरिकन वस्तू आणि सेवांवर जे देश आयात शुल्क आकारतात किंवा अमेरिकेचा व्यापार ज्या देशांसोबत असंतुलित आहेत, त्यांच्या विरुद्ध टॅरिफ आकारणार असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली होती. पहिल्या टप्प्यात मेक्सिको, चीन आणि कॅनडावर टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती.  भारतावर रेसिप्रोकल टॅक्स 2 एप्रिलपासून आकारणार असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली होती. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनं सर्वांना धक्का दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, आम्हाला असं फसवण्यात आलं आहे की इतिहासात कुठल्याही देशानं कुणाला फसवलं नसेल. आम्ही त्यांच्यासोबत चांगला व्यवहार करायचा प्रयत्न करत आहोत मात्र ही देशासाठी मोठी रक्कम आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी एअर फोर्स वन विमानात पत्रकारांना म्हटलं की, आम्ही सर्व देशांसोबत सुरुवात करणार आहोत, त्यासाठी काय होतंय ते पाहूयात. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून काही टॅरिफ मागं घेतली जाऊ शकतात, अशी शक्यता आहे. अध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटलं की टॅरिफचा प्रभाव मूठभर देशांवर होणार नाही. परस्पर शुल्काचा निर्णय 10 ते 15 देशांसाठी असेल यासंदर्भातील अफवा देखील त्यांनी फेटाळून लावली. डोनाल्ड ट्रम्प यांनी 10 किंवा 15 देशांबाबत नाही तर सर्व देशांबाबत बोलतोय, टॅरिफमध्ये कोणतीही कपात नाही, असं ट्रम्प म्हणाले.

सुरुवातीला अमेरिकन प्रशासनाच्या मतानुसार जे देश त्यांच्यासोबत असंतुलित व्यापार करतात त्यांच्यावर परस्पर शुल्क आकारलं जाईल अशी शक्यता होती. म्हणजेच जे देश अमेरिकन वस्तूंवर अधिक टॅरिफ आकारतात. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे ट्रेजरी सचिव स्कॉट बेसेंट यांनी एका 15 देशांच्या ग्रुपला डर्टी 15 म्हटलं होतं.

डोनाल्ड ट्रम्प यांनी जे देश गेल्या अनेक दशकांपासून अमेरिकेसोबत आहेत त्यांच्यावर कमी प्रमाणात शुल्क आकारण्याचे संकेत दिले.

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर देखील परस्पर शुल्क लादण्याची घोषणा केलेली आहे. आता भारताकडून अमेरिकेसोबत व्यापारी करार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ज्यामुळं टॅरिफ वॉरची झळ भारताला कमी प्रमाणात बसेल.

हेदेखील वाचा

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.