नोव्हेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान झालेल्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रिषभ पंतच्या एका चुकीच्या शॉटनंतर माजी कर्णधार सुनील गावसकरांनी केलेली 'स्टुपिड, स्टुपिड, स्टुपिड' कमेंट प्रचंड व्हायरल झाली होती. त्यानंतर इंडियन प्रीमियर लीग २०२५ (IPL 2025) आधी त्यांनी याच कमेंटच्या अधारावर रिषभ पंतसोबत एका कंपनीची जाहीरातही केली.
त्यामुळे या कमेंटची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. आता पुन्हा एकदा लाईव्ह टीव्ही शोमध्ये गावसकरांनी रिषभ पंतचं नाव घेत या कमेंटची आठवण करून दिली आहे.
मंगळवारी आयपीएल २०२५ मध्ये लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात सामना एकना स्टेडियमवर झाला. या सामन्यापूर्वी आयपीएल २०२५ शोडाऊन शोमध्ये सर्वांना त्यांच्या 'स्टुपिड, स्टुपिड, स्टुपिड' कमेंटची आठवण करून दिली.
त्यांना कर्णधार असलेल्या लखनौ संघाच्या फलंदाजीच्या रणनीतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी उत्तर देताना त्याच या कमेंटचा वापर केला होता.
लखनौ संघासाठी सध्या त्यांच्या वेगवान गोलंदाजांच्या दुखापतीची चिता सतावत आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज मोहसिन खान दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला, ज्याच्या जागेवर शार्दुल ठाकूरला संधी मिळाली.
आवेश खानही नुकताच दुखापतीतून सावरून संघात दाखल झाला आहे. मयंक यादव अद्यापही दुखापतीमुळे उपलब्ध नाही. असे असताना लखनौ संघाने फलंदाजी मात्र आक्रमक केली आहे. त्यांच्या संघातील निकोलस पूरनकडे ऑरेंज कॅपही आहे.
दरम्यान, लखनौच्या पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी प्रेझेंटेटरकडून गावसकरांना प्रश्न विचारण्यात आला की संघातील गोलंदाजांच्या दुखापतीमुळे लखनौ संघ आक्रमक फलंदाजी करत असावा का? यावेळी गावसकरांनी ज्याप्रकारे उत्तर दिले, त्यामुळे प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर हास्य होते.
गावसकर म्हणाले, 'जर थोडे आधी हा प्रश्न तुम्ही मला विचारला असता, तर. कारण मी थोडा वेळ रिषभ पंतसोबत घालवला होता. मी त्याला याबद्दलविचारलं असतं की तुम्ही गोलंदाजांच्या दुखापतीमुळे अशी फलंदाजी करत आहात का? कदाचित त्याने उत्तर दिले असे स्टुपिड, स्टुपिड, स्टुपिड.'
गावसकर पुढे स्पष्ट करताना म्हणाले, 'जर तुम्ही निकोलस पूरन आणि मिचेल मार्श यांच्याकडे पाहिले, तर लक्षात येईल ते नैसर्गिकच आक्रमक खेळाडू आहेत. मला वाटतं त्यामुळे ते त्याप्रकारे फलंदाजी करत आहेत आणि त्यांना पाहाणे रोमांचक आहे. आणि त्यानंतर रिषभ पंत खाली फलंदाजीला येतो.'
'त्यामुळे त्यांच्याकडे तशी फलंदाजी आहे आणि नक्कीच त्यांना हे माहित आहे. हे पाहा, जर त्यांच्याकडे गोलंदाजीचे पर्याय फार वाहीत,तर त्यांना धावफलकावर थोड्या जास्त धावा लावाव्या लागणार आहेत.'
दरम्यान, लखनौने पंजाबविरुद्ध ८ विकेट्सने पराभव स्वीकारला आहे. लखनौने दिलेल्या १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग पंजाबने १७ व्या षटकातच पूर्ण केला.