पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पाकिस्तानला टी२० मालिकेत ४-१ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांना वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यातही लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला.
नेपियरला शनिवारी (२९ मार्च) झालेल्या पहिल्या वनडेत न्यूझीलंडने पाकिस्तानला ७३ धावांनी पराभूत करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पण या सामन्यात एक चूक झाली. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) त्यांच्यावर कारवाई केली आहे.
पाकिस्तानला सामना शुल्काच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. कारण पाकिस्तानकडून निर्धारित षटकांची गती राखली गेली नाही (Slow Over Rate). आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने २ षटके निर्धारित वेळेपेक्षा उशीरा टाकली होती.
आयसीसीने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की 'मोहम्मद रिझवान कर्णधार असलेल्या पाकिस्तान संघाने निर्धारित वेळेपेक्षा दोन षटके उशिराने टाकल्याचे निदर्शनास आल्याने आयसीसी एलिट पॅनलमधील सामनाधिकारी जेफ क्रो यांनी शिक्षा ठोठावली आहे.'
खेळाडूंसाठी आणि सपोर्ट स्टाफसाठी असलेल्या आचारसंहितेतील कलम २.२२ षटकांची गती कमी राखण्याच्या चुकीसंदर्भात आहे. यानुसार संघाकडून निर्धारित वेळेपेक्षा उशीरा टाकण्यात येणाऱ्या प्रत्येकी एका षटकासाठी त्या संघातील खेळाडूंना सामना शुल्काच्या ५ टक्के दंड ठोठावण्यात येणार आहे.
याच नियमानुसारा पाकिस्तानी खेळाडूंना १० टक्क्यांचा दंड झाला आहे. कारण पाकिस्तान संघाने दोन षटके उशीरा टाकली होती.
पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने चूक मान्य केली असून शिक्षाही मान्य केली आहे. त्यामुळे याबाबत अधिकृत सुनावणी होणार नाही. पाकिस्तान संघावर षटकांची गती कमी राखल्याचा आरोप मैदानातील पंच ख्रिस ब्राऊन, पॉल रायफल, तिसरे पंच मायकल गॉफ आणि चौथे पंच वेन नाईट यांनी केला होता.
दरम्यान, पहिल्या वनडेबद्दल सांगायचे झाले, तर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करतान ५० षटकात ९ बाद ३४४ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून मार्क चॅपमनने १११ चेंडूत १३२ धावा केल्या होत्या. तसेच डॅरिल मिचेलने ७६ धावा आणि मुहम्मद अब्बासने ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना इरफान खानने ३ विकेट्स घेतल्या होत्या.
त्यानंतर ३४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला ४४.१ षटकात सर्वबाद २७१ धावाच करता आल्या. पाकिस्तानकडून बाबर आझमने ८३ चेंडूत ७८ धावांची खेळी केली. सलमान आघाने ४८ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. पण बाकी कोणी मोठी खेळी करू शकले नाहीत. न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना नॅथन स्मिथने सर्वाधिक ४ विकेट्स घतल्या.