'विश्वास' स्वतःवरील
esakal April 02, 2025 09:45 AM

- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक

आशा ते करविते बुद्धीचा तो लोप ।

संदेह तें पाप कैंसें नव्हे ॥

आपुला आपण करावा विचार ।

प्रसन्न ते सार मन ग्वाही ॥

- संत तुकाराम

विविध प्रकारच्या संदेहांमुळे बुद्धीचा लोप होतो. ती विचलीत होते. स्वसंदेह उत्पन्न होणे, हे पापच आहे, असे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सुचवतात. म्हणून आपण स्वतः विचार करून पहावा. मन प्रसन्न ठेवावे. प्रसन्नतेलाही आपलेच मन साक्षी असते. हे साक्षीपण साधणे म्हणजे ‘शाईन!’ काम करण्याची जागा आपण स्वच्छ करतो तशीच ‘शाईन’ ही मन स्वच्छतेची प्रक्रिया आहे.

आपल्याला नेमके काय करायचे याची उजळणी आहे. ‘स्वॉग ॲनालिसिस’च्या वेळी स्वतःमध्ये आढळलेली बलस्थाने वारंवार अधोरेखित करून त्यावर आधारित उपलब्ध संधींवर मनन, चिंतन करणे. संधींचे सोने करण्याची प्रक्रिया, त्याबद्दलचे तसे नियोजन आणि कृती आणि कृतीचे व्यवस्थापन या चौथ्या ‘S’ च्या पूर्वतयारीसाठी ‘शाईन’ ही पायरी महत्त्वाची आहे.

आधी आपण ठरवले पाहिजे की, मी स्वतःच्या आरशात कसा दिसतो? आता प्रत्यक्षात फक्त आरसाच स्वच्छ नाही करायचा तर, स्वतःला अंतर्बाह्य निर्मळ करायचे.

यासाठी कुठला बाहेरचा साबण नाही वापरायचा. तर स्वतःकडेच अत्यंत तटस्थपणे पाहून, अंतर्मुख व्हायचे. मी नेमका कसा आहे? तर असा-असा आहे, हे स्वतःवरच अगदी आत्मविश्वासाने ठसवायचे.

अंतर्मनाचा कोपरा न् कोपरा स्वशोधाच्या खात्रीने कसा लख्ख उजळून निघायला हवा. यासाठीच ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे.

अत्यंत स्पष्टपणे, आपण स्वतःच्याच समोर, उभे रहायचे. ‘शाईन’ ही एक प्रकारे ‘माईंड जीम’ आहे. व्यायामशाळेत आपण आपले बाहू दणकट, पिळदार, देखणे करत जातो. त्याप्रमाणे मनाचे अनेक विभाग, प्रत्येक पेशी न् पेशी, न्युरॉन्स, केंद्रके बळकट करणे म्हणजे, ‘माईंड शाईन’ ही प्रक्रिया. स्वतःमधील कमतरता, न्यून कमी करणे किंवा त्यांचा प्रभाव कमी करणे, ही प्रक्रिया मन शुद्धीकरणासाठी उपयुक्त ठरते.

स्वतःमध्ये सकारात्मकतेची, कृतज्ञतेची पेरणी करायची, तद्वत योग्य ती मशागत करायची. स्वतःचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव वैशिष्ठ्ये क्रमाक्रमाने उन्नत आणि समृद्ध कशी होत जातील, याचा सराव म्हणजे ‘शाईन!’

आयुष्य उजळण्यासाठी

जळतात जिवाने सगळे

जो वीज खुपसतो पोटी

तो एकच जलधर उजळे

कवी ग्रेस यांच्या ओळी शाईन या प्रकारासाठी चपखल वाटतात. यशस्वी होण्यासाठी, फुका जीव जाळून काय उपयोग, विजा अंगी बाळगण्याचे दुःसाहस करून, त्या दर्जाचे कष्ट करून, ती उच्च कोटीची वेदना सहन करण्याचे धाडस जो करतो त्याला यश प्राप्त होते. बरं हे उजळणे एकदाच नाही, तर वारंवार करायचे. म्हणजे ते सवयीचे होते. तर हा उजळण्याचा सराव रोज करून आयुष्यात आपल्या प्रगल्भतेचा प्रत्यय इतरेजनांना आणि स्वतःलाही, कसा येत जाईल अशा सवयी जडवणे, आदर्श दिनचर्या स्थापित करणे म्हणजेच ‘स्टँडर्डाईज.’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.