नवी दिल्ली : देशभरात उन्हाचा तडाखा वाढत चालला असून अनेक भागांमध्ये पाऱ्याने चाळिशी ओलांडली आहे. या वाढत्या उष्णतेमुळेच उष्णतेशी संबंधित आजारही बळावण्याची शक्यता असून केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आरोग्यविषयक सुविधा अधिक बळकट करण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिल श्रीवास्तव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात भविष्यामध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्र होऊ शकते असे म्हटले आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून सुधारित आरोग्यविषयक दिशा-निर्देश जारी करण्यात आले आहेत. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या संकेतस्थळावर ही मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
ज्या जिल्ह्यांना उष्णतेचा तडाखा बसू शकतो त्या जिल्ह्यांतील यंत्रणांपर्यंत ही माहिती पोचवा असे स्पष्टपणे सांगण्यात आले. केंद्र सरकारने १ मार्चपासूनच उष्माघाताची सर्वसमावेशक आरोग्यविषयक माहिती ‘आयएचआयपी’ या स्वतःच्या प्लॅटफॉर्मवर अपडेट करायला सुरूवात केली आहे. मध्यंतरी याच अनुषंगाने अधिकाऱ्यांना व्हर्च्युअल प्रशिक्षणही देण्यात आले होते. भारतीय हवामान विभाग हा दररोज उष्णतेच्या लाटेबाबत इशारा देत असतो. हीच माहिती राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाला (एनसीडीसी) देखील देण्यात येते. तीच माहिती पुढे राज्य, जिल्हा आणि शहर या पातळीवर पोचविली जाते.
म्हणून पुरेसे पाणी द्याआरोग्य केंद्रांमध्ये विविध प्रकारच्या उपाययोजना आखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंखे, कुलर यांचा विद्युत प्रवाह सुरळीत ठेवला जावा, थंड आणि हिरव्या रंगाच्या छताच्या माध्यमातून खोलीतील तापमान कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जावा. जलपुनर्भरण आणि पाण्यांवर फेरप्रक्रिया करून ते पाणी वापरण्यात यावे असेही सांगण्यात आले आहे.
विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर
केंद्राच्या सूचनासर्व राज्यांनी उष्माघात रोखण्यासाठी उपाय आखावेत
ग्रामपातळीपासून मोठ्या शहरांपर्यंत आरोग्य केंद्रे सज्ज ठेवावीत
गरजू रुग्णांना त्वरित उपचार मिळतील याची खात्री करावी
आरोग्य सुविधा आणि औषधसाठा उपलब्ध करून द्यावा
रुग्णालयात औषधे, आयव्ही फ्लूएड्स, ओआरएस पावडर ठेवावी
आरोग्य केंद्रांमध्ये शुद्ध पेयजलाची सोय करावी
उष्माविकारांबाबत डॉक्टर, परिचारिकांना प्रशिक्षण द्यावे
उष्णतेच्या लाटेबाबतची माहिती जनतेपर्यंत पोचवावी
हलके, सैल, पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावे
दुपारच्या वेळी उन्हामध्ये जाणे टाळावे
दुपारी घराच्या बाहेर पडता कामा नये
पुरेशा प्रमाणात पाणी, ओआरएस घ्यावे
थकवा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा