बांगलादेशातील सध्याची राजकीय परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. देशात लष्करी राजवट आणि आणीबाणी लागू होण्याची चर्चा जोरात सुरू आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारविरोधात देशातील जनतेत मोठ्या प्रमाणात असलेला असंतोष, बेरोजगारी आणि वाढती महागाई. दरम्यान, माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या मायदेशी परतण्याच्या अफवांनाही बळ मिळाले आहे.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सत्ता आणि देश सोडून जाण्यास भाग पडलेल्या शेख हसीना बांगलादेशातील परिस्थितीवर उघडपणे बोलत आहेत. त्यांचा पक्ष अवामी लीगही जमिनीवर सक्रीय होताना दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हसीना यांनी बांगलादेशमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवामी लीगच्या समर्थकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तर काही महिन्यांतच पक्ष मोठे पुनरागमन करू शकतो, असा दावा काही अवामी नेत्यांनी केला आहे.
शेख हसीना यांचे चिरंजीव सजीब वाजेद जॉय, यूएसए अवामी लीगचे नायब सदर रब्बी आलम आणि पक्षाचे संयुक्त सचिव एएफएम बहाउद्दीन नसीम यांच्यासह अवामी लीगच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी हसीना बांगलादेशात परततील अशी आशा व्यक्त केली आहे. मात्र, अवामी लीगचे पुनरागमन इतक्या सहजासहजी होणार नाही. त्याच्या मार्गातील अडथळ्यांची यादी खूप मोठी आहे.
अलीकडेच बीएनपी आणि जमातसह विरोधी गटांशी झालेल्या हिंसक संघर्षामुळे ढाक्यातील अवामी लीगची रॅली हाणून पाडली आहे. अशा परिस्थितीत शेख हसीना यांच्या संभाव्य पुनरागमनामुळे सध्या एकमेकांपासून दूर जाताना दिसणारे त्यांचे विरोधक पुन्हा एकत्र येऊ शकतात. खरे तर ऑगस्ट 2024 मध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीगचे सरकार उलथवताना बांगलादेशातील विविध राजकीय गटांमध्ये अप्रतिम एकजूट निर्माण झाली होती, पण आता त्यात दरी दिसू लागली आहे.
पण इथे सर्वात महत्त्वाची भूमिका लष्कराची असेल. माजी पंतप्रधान शेख हसीना यांची हकालपट्टी आणि युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात सुरक्षा दलांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ लष्कर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अधिकारांचा वापर करून नागरी प्रशासनाला मदत करत आहे.
मात्र, लष्कर, राजकीय पक्ष आणि शेख हसीना यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी संघटनांमध्ये सर्व काही सुरळीत नाही. प्रसिद्ध विद्यार्थी कार्यकर्ते आणि नव्या नॅशनल सिटिझन पार्टीचे नेते हसनत अब्दुल्ला यांनी नुकताच लष्करप्रमुखांबाबत मोठा दावा केला आहे. लष्करप्रमुख जनरल वकार उज जमान नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांची मुख्य सल्लागार पदी नियुक्ती करण्यास उत्सुक नाहीत.