नअस्कार! दिल्लीतल्या साहित्य संमेलनानंतर थोडी आगऱ्याला हिंडून आल्ये. चिमटीत धरुन ताजमहालाचा (माझ्यासोबत) फोटो घेतला. तळहातावरही ताजमहाल ठेवून सेल्फी घेतली. शेवटी ज्या दिवशी मोबाइल फोनची मेमरी फुल्ल झाली, त्या दिवशी पुण्याला परतले. आल्ये ती पार शिणवट्यानं आडवीच झाल्ये. सोसायटीतली नतद्रष्ट मुलं अधून मधून मी दिसले की घोरण्याचे आवाज काढून चिडवायची. पण मी लक्ष दिलं नाही. पुन्हा एकदा रसिकांसाठी मी हौस ऑफ बांबूचे दरवाजे उघडले आहेत. वेलकम!
माझ्या गैरहजेरीत मराठी सांस्कृतिक विश्वाचं काही बरंवाईट झालं नाही ना, या विचारानं काळवंडल्ये होत्ये. शेवटी घडायचं ते घडलंच. मला बेसावध पकडून काही लोकांनी डाव साधलाच! मी नसल्याचा फायदा घेऊन काही जुन्या मंडळींनी नस्त्या उठाठेवी सुरु केल्याची खुफिया जानकारी (टीव्ही च्यानलांमुळे हा शब्द मी मराठीत घेऊन टाकला आहे आता! काय करणार?) मला मिळाली आहे.
रोहित शर्माबरोबर ओपनिंगला अचानक सचिन तेंडुलकर किंवा (अगदी) सुनील गावस्कर पॅड बांधून बॅट फिरवत मैदानात शिरताना पाहिला, तर कसा स्टेडियमवर थरकाप उडेल, तस्सं मला झालंय! परवा, गुरुवारी रंगभूमी दिन होता. तो मी पुण्याच्या पद्धतीनं साजरा केला. पण कानावर येणाऱ्या बातम्या गंभीर आहेत.
मराठी सिनेक्षेत्रातले बिग बॉस रा. म. वा. मांजरेकर यांनी मराठी नाट्यरसिकांना फिल्टर कॉफी पाजायचा संकल्प सोडलाय. महेश वामन मांजरेकर हे गृहस्थ सिनेमा-नाटकं सोडून स्वयंपाकघराकडे वळले आहेत, हे मी ऐकलं होतं. ऐकून जीव अगदी ‘सुक्का सुखी’ झाला होता. पण आता लोकांना मुर्गी-मासे खिलवताना फिल्टर कॉफी (पण) पाजण्याचा त्यांचा उपक्रम झोप उडवणारा आहे. त्यांनी ‘फिल्टर कॉफी’ हे आख्खं नाटक लिहिलंय, आणि स्वत: दिग्दर्शनही केलंय. विराजस कुलकर्णी आणि उर्मिला कानेटकर यांच्या जोरदार भूमिका आहेत म्हणे. सस्पेन्स थ्रिलर असल्यानं मी दुपारचा प्रयोग बघायला जाणार आहे.
ख्यातनाम दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी ऊर्फ जगमित्र चंकु यांनी ‘भूमिका’ हे नवंकोरं नाटक आणायचा घाट घातलाय. क्षितीज पटवर्धनचं लिखाण, म्हणजे इंटरेस्टिंग असणार यात शंका नाही. त्यात नेहले पे दहला म्हणजे २१ वर्षांनी या नाटकातून सचिन खेडेकर रंगभूमीवर पुनरागमन करणार आहे. सचिन…अहह! कॉलेजच्या काळात आम्ही (मुली) त्याला राजा म्हणत असू. तोही प्रेमानं ‘ओ’ देई. मला ‘सरेऽऽ’ अशी एकदा हाक मारली होती. पण मी ओ दिल्यावर घाबरुन म्हणाला, ‘तिकडे सर ए…’ असं म्हणालो!! जाऊ दे. जुन्या गोष्टी!! आणखी एक व्हेटरन कलावंत मैदानात उतरणार आहे. आमच्या सर्वांच्या लाडक्या वंदनाताई गुप्ते नव्या नाटकातून येताहेत. संकर्षण कऱ्हाडे ऊर्फ धडपड्या संकु यानं ‘कुटुंब किर्रतन’ नावाचं विनोदी नाटक लिहिलंय, त्यात वंदनाताईंची मस्त भूमिका आहे म्हणे.
तिकडे पुरुषोत्तम बेर्डे यांनीही नव्या नाटकाची जुळवाजुळव केल्याची खबर आहे. त्यांच्या नाटकाचं अजून मला नाव कळलेलं नाही, पण पुरुला त्या निमित्तानं फोन करीन आणि विचारुन थोडी टुरटुर करीन. मग तो ‘ये ना प्रयोगाला’ असं (मारुन मुटकून का होईना) म्हणेलच. मग क्काय…जाऊ दे. एकंदरित जुनी, सराईत मंडळी पुन्हा पॅड-हेल्मेटसह हातात ब्याट परजत अवतरली आहेत. याच कलांवंतांनी काही दशकांपूर्वी मराठी रंगमंच दशकभर गाजवला होता. नव्या कलाकारांना वाट मोकळी करुन दिली होती. आता तीच मंडळी पुन्हा सक्रिय होताना बघून मौज वाटतेय. यावेळचा रंगभूमी दिन सत्कारणी लागला, असं म्हणायचं.