Latest Marathi News Updates : कोल्हापूर जिल्ह्यात आज, उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
esakal March 29, 2025 03:45 PM
Kolhapur Rain LIVE : कोल्हापूर जिल्ह्यात आज, उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

कोल्हापूर : वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात शनिवारी (ता. २९) व रविवारी (ता. ३०) पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे घाटमाथ्यासह सर्वच भागांतील लोकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी केले आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून संबंधित आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Education News : उन्हाळ्यामुळे शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याच्या सूचना

फुलेवाडी : राज्यात कडक उन्हाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होऊ नये यासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रातच भरवून शाळेच्या वेळापत्रकात बदल करण्याच्या सूचना राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी व माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी आज एका आदेशाद्वारे दिले आहेत.

Ambedkar Jayanti LIVE : आंबेडकर जयंतीला 'राष्ट्रीय सुटी' जाहीर

नवी दिल्ली : भारतरत्न डॉ. कर यांच्या जयंतीदिनी १४ एप्रिलला केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय सुटी’ जाहीर केली आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक, लोक तक्रार आणि निवृत्तिवेतन (डीओपीटी) मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना जारी केली.

Manoj Jarange Patil LIVE : बीडमध्ये भाषण सुरू असतानाच अचानक प्रकृती बिघडली; मनोज जरांगेंवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बीडमध्ये झालेल्या मेळाव्या दरम्यान भाषण करत असताना अचानक जरांगेंची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांच्या तपासण्या आणि रक्ताचे नमुने घेतले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Barshi City Police LIVE : पत्नी सोडून गेली म्हणत भावाला मारहाण

सोलापूर : ‘तुझ्यामुळे माझी पत्नी मला सोडून माहेरी गेली’ असे म्हणून शिवीगाळ करून भावाने दगडाने मारहाण केल्याची फिर्याद गुल महम्मद अब्दुल लतीफ आतार (रा. मंगळवार पेठ, बार्शी) यांनी बार्शी शहर पोलिसांत दिली. त्यावरुन मोहसीन अब्दुल लतीफ आतार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवार पेठेतील उद्यानाजवळ मित्रांसोबत बोलत थांबल्यावर भाऊ मोहसीन हा मद्यपान करून तेथे आला. त्याने शिवीगाळ सुरू केली, शिवीगाळ करू नको म्हटल्यावर त्याने तेथील दगड उचलून मारला. त्यात उजवा पाय फ्रॅक्चर झाला असून त्याने बघून घेईन, अशी दमदाटी केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

Afghanistan Earthquake LIVE : थायलंड, म्यानमारनंतर अफगाणिस्तानात ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

आज भारतीय वेळेनुसार, ५.१६ वाजता अफगाणिस्तानात ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. काल थायलंड, म्यानमारमध्ये मोठा भूकंप झाला होता.

Devendra Fadnavis LIVE : अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

सोलापूर : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज (ता. २९ मार्च) पंढरपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. पंढरपूर दौऱ्यात ते श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन मंदिर कामाची पाहणी करणार आहेत. विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि त्यानंतर फडणवीस हे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या घरी भेट देणार आहेत. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच बुधवारी (ता. २६ मार्च) संपलेय.

Prashant Koratkar LIVE : वकिलाचा प्रशांत कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न, ॲड. अमितकुमार भोसलेंवर गुन्हा दाखल

कोल्हापूर : पोलिस कोठडीत असलेल्या प्रशांत कोरटकरला न्यायालयातून पोलिस परत घेऊन जात होते. त्याच्या भोवती पोलिसांचा गराडा होता. त्यातूनही एका वकिलाने त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. न्यायालयाच्या तळमजल्यातील कॅन्टीनजवळ हा प्रकार घडला. पोलिसांनी संबंधित वकिलास चपळाईने ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी रुकडीचे माजी उपसरपंच ॲड. अमितकुमार नानासाहेब भोसले (वय ४५, रा. रुकडी, ता. हातकणंगले) यांच्यावर शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल केल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली.

Hasan Mushrif LIVE : हसन मुश्रीफांच्या 'त्या' वक्तव्याच्या निषेधार्थ इचलकरंजीत आज निदर्शने

इचलकरंजी : इचलकरंजी शहरासाठी शासनाने मंजूर केलेल्या सुळकूड पाणी योजनेची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. राजकीय दबावामुळे ही योजना रखडली असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही योजना व्यवहार्य नसल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सुळकूड पाणी कृती समिती व इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने शनिवारी महात्मा गांधी पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात येणार आहेत.

Surashree Music Festival : 'नाट्यपंढरी'त आजपासून सुरांची बरसात; गायन, गझल, हिंदी-मराठी गीतसंगीतासह वाद्यांची रंगणार जुगलबंदी

सांगली : मार्चअखेरचा तणाव बाजूला ठेवून दोन दिवस स्वतःच्या आनंदासाठी वेळ काढण्याची ही वेळ आहे. कारण आहे, आजपासून (ता. २९) दोन दिवस विष्णुदास भावे नाट्यमंदिरात, तेही वातानुकूलित वातावरणात होणारा ‘सुरश्री संगीत महोत्सव’, तोही अगदी मोफत. यामध्ये शास्त्रीय-उपशास्त्रीय गायन, गझल, हिंदी-मराठी गीतसंगीत आणि वाद्यांची जुगलबंदी रंगणार आहे.

Thailand, Myanmar Earthquake LIVE : थायलंड, म्यानमारला भूकंपाचा हादरा; भूकंपामुळे 144 जणांचा मृत्यू

Latest Marathi Live Updates 29 March 2025 : थायलंड आणि शेजारील म्यानमारला काल दुपारी ७.७ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपामुळे म्यानमारमध्ये १४४ जणांचा मृत्यू झाला असून, थायलंडची राजधानी बँकॉकमध्येही किमान आठजण मृत्युमुखी पडले आहेत. तसेच पोलिस कोठडीत असलेल्या प्रशांत कोरटकरला न्यायालयातून पोलिस परत घेऊन जात होते. त्याच्या भोवती पोलिसांचा गराडा होता. त्यातूनही एका वकिलाने त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. न्यायालयाच्या तळमजल्यातील कॅन्टीनजवळ हा प्रकार घडला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी १४ एप्रिलला केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय सुटी’ जाहीर केली आहे. मुश्रीफ यांच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सुळकूड पाणी कृती समिती व इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने आज महात्मा गांधी पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पंढरपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत असून काही भागांत पाऊस पडत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.