आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 12 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात पहिला विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 8 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला आहे. मुंबईने केकेआरला 16.2 ओव्हरमध्ये 116 धावांवर ऑलआऊट केलं. त्यानंतर मुंबईने 117 धावांचं आव्हान हे 12.5 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. या सामन्यात मुंबई इंडियन्ससाठी डेब्यू करणारा अश्वनी कुमार चमकला. अश्वनीने पदार्पणातील सामन्यात धमाकेदार कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अश्वनीने पदार्पणात 3 रेकॉर्ड केले. त्याने नक्की काय काय केलं? हे सविस्तर जाणून घेऊयात.
अश्वनीला एस राजू याच्या जागी प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. अश्वनीने या संधीचं सोनं केलं आणि इतिहास घडवला. अश्वनीने त्याच्या पहिल्याच ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. अश्वनीने केकेआरचा कॅप्टन अजिंक्य रहाणे याला आऊट केलं. अश्वनी यासह मुंबईसाठी पहिल्याच बॉलवर विकेट घेणारा चौथा गोलंदाज ठरला. मुंबईसाठी याआधी अली मुर्तझा, अल्झारी जोसेफ आणि डेवाल्ड ब्रेव्हिस या तिघांनी अशी कामगिरी केलीय.
अश्वनीने त्यांनतर रिंकू सिंह, आंद्रे रसेल आणि मनीष पांडे या स्फोटक फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. अश्वनीने 3 ओव्हरमध्ये 24 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या. अश्वनी यासह आयपीएल पदार्पणात 4 विकेट्स घेणारा पहिलाच भारतीय ठरला. अश्वनीने याबाबत तिघांना मागे टाकलं. अमित सिंह, विजय कुमार वैशाक आणि संदीप शर्मा या तिघांनीही आयपीएल पदार्पणात 3 विकेट्स घेतल्या होत्या.
दरम्यान अश्वनीला या कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. अश्वनीला 5 विकेट्स घेण्याची संधी होती. मात्र कर्णधार हार्दिक पंडया याने अश्वनीला चौथी ओव्हर टाकण्याची संधी दिली नाही. त्यामुळे अश्वनीची 5 विकेट्स घेण्याची संधी हुकली.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रायन रिकेल्टन, विल जॅक्स (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार आणि विघ्नेश पुथूर.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.