मुंबई : भारत केवळ आर्थिक आघाडीवर आपल्या विकासाच्या गतीने जगाला प्रभावित करत नाही, तर भारतात अब्जाधिशांची संख्याही तितकीच मोठी आहे. अब्जाधीशांच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं ती अनेक देशांच्या जीडीपीहून अधिक असल्याचं दिसून येतंय. भारतीय उद्योगपतींकडे सौदी अरेबियाच्या जीडीपीपेक्षा जास्त संपत्ती असल्याचं हुरुन ग्लोबल रिच रिपोर्टमधून समोर आलं आहे. भारतात या घडीला 284 अब्जाधीश असल्याचं हुरुन ग्लोबल रिच लिस्टमधून स्पष्ट झालं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत देशातील अब्जाधीशांच्या संख्येत 13 ने वाढ झाली आहे.
या सर्व अब्जाधीशांची मालमत्ता एकत्र केली तर ती सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त होईल. हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025 नुसार, भारतीय उद्योगपतींची एकूण संपत्ती ही 98 लाख कोटी रुपये आहे. ही संपत्ती ही देशाच्या जीडीपीच्या सुमारे एक तृतीयांश आहे.
संपत्तीचा हा आकडा सौदी अरेबियाच्या GDP पेक्षा कितीतरी जास्त आहे. सौदीचा जीडीपी हा 91.35 लाख कोटी ($1,067,582.93 दशलक्ष) इतका आहे. हुरुन ग्लोबल रिच लिस्टनुसार, भारतातील अब्जाधीशांच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे देशाच्या जीडीपीमध्येही वाढ झाल्याचं स्पष्ट होतंय.
भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीने ट्रिलियन डॉलर्सचा आकडा पार केला आहे आणि हे समृद्धीच्या नव्या युगाचे लक्षण आहे. विशेष म्हणजे 62 टक्के अब्जाधीशांच्या संपत्तीत यंदा वाढ झाली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे सर्वात श्रीमंत भारतीय आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही 8.6 लाख कोटी रुपये इतकी आहे. तसेच ते सर्वात श्रीमंत आशियाई आहेत.
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानींच्या एकूण संपत्तीमध्ये सुमारे 1 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. भारतीय श्रीमंताच्या संपत्तीच्या वाढीमधील ही सर्वाधिक वाढ आहे. अदानीची एकूण संपत्ती 13 टक्क्यांनी वाढली आहे. त्यांची एकूण संपत्ती 8.4 लाख कोटी रुपये आहे. अदानी हे श्रीमंत भारतीयांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
रोशनी नाडर यांच्या वडिलांनी, शिव नाडर यांनी HCL टेक्नॉलॉजीजमधील 47 टक्के स्टेक हे रोशनींच्या नावावर हस्तांतरीत केले आहेत. त्यामुळे 3.5 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह रोशनी नाडार या तिसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत भारतीय व्यक्ती ठरल्या आहेत.
सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचे दिलीप सांघवी हे चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत भारतीय आहेत. सांघवी यांची एकूण संपत्ती 2.5 लाख कोटी रुपये आहे. अझीम प्रेमजी हे विप्रोचे अध्यक्ष आणि सर्वात मोठे भागधारक आहेत. प्रेमजी यांच्याकडे 2.2 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे आणि ते या यादीतील 5 व्या क्रमांकाचे श्रीमंत भारतीय आहेत.
अलिकडच्या वर्षांत भारतातील अब्जाधीशांच्या संख्येत बरेच चढ-उतार झाले आहेत. 2022 मध्ये देशात 249 अब्जाधीश होते, परंतु 2023 मध्ये बाजारातील अनिश्चिततेमुळे ही संख्या 187 पर्यंत कमी झाली होती. मात्र, याउलट 2024 मध्ये अब्जाधीशांची संख्या 271 वर पोहोचली होती. आता 2025 मध्ये भारतीय अब्जाधीशांची संख्या 284 झाली आहे.
अधिक पाहा..