Mumbai Indians: '...आणि मला विकेट मिळाल्या', पदार्पणात ४ विकेट्स घेणाऱ्या अश्वनी कुमारला हार्दिक पांड्याने काय दिलेला सल्ला?
esakal April 01, 2025 08:45 AM

मुंबई इंडियन्सने सोमवारी (३१ मार्च) इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेच्या १२ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला पराभवाचा धक्का दिला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला ८ विकेट्सने पराभूत केले.

या हंगामातील मुंबईचा हा पहिलाच घरच्या मैदानातील सामना होता. मुंबईच्या या विजयात २३ वर्षीय अश्वनी कुमारने मोलाचा वाटा उचलला.

अश्वनीने मुंबईकडून या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने त्याच्या पहिल्याच चेंडूवर अजिंक्य रहाणेची विकेट घेतली. तसेच एकूण ४ विकेट्स त्याने या सामन्यात घेतल्या, ज्यात रहाणेशिवाय रिंकु सिंग, मनिष पांडे आणि आंद्रे रसेल यांच्या विकेट्सचा समावेश आहे.

तो पदार्पणातच ४ विकेट्स घेणारा पहिलाच भारतीय देखील ठरला. त्यामुळे त्याला या सामन्यात सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. त्याच्या कामगिरीबद्दल त्याने पहिल्या डावानंतर आणि सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर भावना व्यक्त केल्या आहेत.

पहिल्या डावात त्याच्या गोलंदाजीमुळे कोलकाताला १६.२ षटकातच ११६ धावांवर रोखले होते. पहिल्या डावानंतर अश्वनी त्याच्या गोलंदाजीबदद्ल बोलताना म्हणाला, 'मला खूप छान वाटतंय, सुरुवातीला थोडं दडपण आलं होतं. पण, संघातील वातावरण इतकं छान आहे की मला नंतर दडपण जाणवले नाही.'

त्याला सामन्यापूर्वी काय खाल्लं होतं, असं विचारल्यानंतर तो म्हणाला, 'मी एक केळी खाल्ली होती, कारण जरा दबाव होता, त्यामुळे भूक लागली नव्हती. हो, मी थोड्या गोलंदाजीच्या योजना आखल्या होत्या, पण त्यांनी मला सांगितले पहिल्या सामन्यात तुझ्या खेळाचाही आनंद घे आणि जशी गोलंदाजी करतोस, तशीच कर.'

कर्णधार हार्दिक पांड्याने काय सांगितलं? यावर बोलताना अश्वनी म्हणाला, 'हार्दिक भाईने मला शॉर्ट बॉल आणि शरिरावर बॉल टाकायला सांगितले. त्यामुळे विकेट मिळाल्या. माझ्या गावात सर्वजण मला पाहात असतील. ते माझ्या पदार्पणाची प्रतीक्षा करत होते. ईश्वराच्या कृपेने मला आज संधी मिळाली आणि मी चांगली कामगिरी केली.'

सामन्यानंतर सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर अश्वनी म्हणाला, 'अशी संधी मिळणे आणि सामनावीर पुरस्कार जिंकणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. माझं गाव मोहाली जिल्ह्यात आहे. इथपर्यंत पोहचायला खूप मेहनत घेतली आहे आणि ईश्वराच्या कृपेने मी इथे आहे.'

'मला पूर्ण आत्मविश्वास होता, पण सामन्यापूर्वीचे थोडे दडपणही होते. मला जी संधी मिळेल, त्यातून मी माझ्या गावातील लोकांना अभिमान वाटेल, अशी कामगिरी करेल.'

कोलकाताने दिलेलं ११७ धावांचे लक्ष्य मुंबई इंडियन्सने १२.५ षटकात पूर्ण केलं. मुंहईकडून रायन रिकल्टनने ४१ चेंडूत ६२ धावांची नाबाद खेळी केली. त्याने ४ चौकार आणि ५ षटकार मारले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.