जालना : आयपीएल क्रिकेट सामान्यांवर सट्टा घेणाऱ्या आणि लावणाऱ्या चार जणांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर, मुख्य तीन बुकी फरारी असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक नांदेड येथे रवाना झाले आहे.
शहरात पोलिसांनी यापूर्वी दोन कारवाया करत एकूण सात बुकींवर कारवाई केली आहे. तरीदेखील शहरात आयपीएलवरील सट्टेबाजी जोरात सुरू आहे. या सट्टेबाजीबद्दल खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (ता. ३१) रात्री कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामान्यावर सट्टा घेणारे आणि लावणारे चार जण पोलिसांना आढळून आले.
नवीन मोंढा, जालनाकडे जाणाऱ्या बायपास रोडलगत असलेल्या हॉटेल कनक पॅलेसच्या पाठीमागील मोकळ्या आवारात हा सट्टेबाजीचा डाव सुरू होता. गोपीसिंग प्रल्हादसिंग टाक (वय २५, रा. गुरू गोविंदसिंगनगर, जालना), अजितसिंग मलखानसिंग कलाणी (वय ३४, रा. लहुजीनगर, चंदनझिरा, जालना), विजय कैलास खरे (वय ३०, रा. कन्हैयानगर, जालना) आणि अमित नंदलाल दागडिया (वय ३४, रा. खरपुडी रोड, जालना) यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून ५३ हजार ५१० रुपयांचे मोबाइल व रोख रक्कम जप्त केली.
दरम्यान, हा सट्टा लोकेश भगत (रा. जालना), हर्षल भगत (रा. जालना), शेख गणी अजिम ऊर्फ जिगरी (रा. देऊळगावराजा, जि. बुलडाणा) या बुकींकडून घेतला जात असल्याचे तपासामध्ये समोर आले. हे तिघे बुकी फरारी असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक नांदेड येथे रवाना झाले आहे.
दरम्यान, याप्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सहायक पोलिस निरीक्षक योगेश उबाळे, अंमलदार सॅम्युअल कांबळे, रामप्रसाद पव्हरे, सागर बाविस्कर, सोपान क्षीरसागर, धीरज भोसले यांनी केली.
तुळजापुरातही कारवाईतुळजापूर येथे चेन्नई विरूद्ध राजस्थान आयपीएल मॅचवर रविवारी (ता.३०) सट्टा खेळवला जात असताना स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. शुक्रवार पेठेतील भोसले गल्लीत अंदाजित धावा आणि यावर होणारी हार-जीत त्याबाबत सट्टा लावण्यात आला होता. कमी पैशात जास्त पैसे देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. मोबाइलद्वारे सट्टा खेळवला जात असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. अमोल रमेश निंबाळकर यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.