Bike Taxi Services to Roll Out in Maharashtra : राज्यात नागरिकांना नाविन्यपूर्ण परिवहन सेवेच्या सुविधा देण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रमांची अंमलबजावणी करीत आहे. याअंतर्गत नागरिकांना सुलभ परिवहन सेवा मिळण्यासाठी बाईक टॅक्सीला मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील किमान एक लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये आता बाईक टॅक्सी धावणार असून याबाबतच्या धोरणास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
रस्त्यावरील वाहन संख्या कमी होण्यासाठी खासगी दुचाकी वाहनांसाठी बाईक पुलिंगच्या पर्यायालासुद्धा शासनाने मान्यता दिली आहे. अशा वाहनांना मोटार वाहन कायद्यांतर्गत योग्यता प्रमाणपत्र, विधीग्राह्य परवाना व विमा संरक्षण बंधनकारक असणार आहे. बाईक टॅक्सीच्या प्रवासी भाड्याचे दर हे संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाद्वारे सुनिश्चित करण्यात येतील.
बाईक टॅक्सीमुळे कमी खर्चात प्रवासासाठी सुलभ पर्याय उपलब्ध होणार आहे. यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य राहणार आहे. या धोरणातंर्गत केवळ परिवहन संवर्गातील इलेक्ट्रीक बाईक टॅक्सीच धावणार आहेत. या योजनेमुळे नागरिकांना स्वस्त प्रवासाचा पर्यायासह ‘लास्ट माईल कनेक्टीव्हीटी’चा पर्याय उपलब्ध होणार आहे.
तसेच शहरातील प्रदूषण व वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होणार असून नवीन रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे. केवळ २० ते ५० वर्ष वयोगटातील चालकांनाच बाईक टॅक्सी सेवा देता येणार आहे. तसेच यामध्ये महिला प्रवाशांना महिला चालकाचा पर्याय निवडण्याची सोय उपलब्ध असणार आहे.