महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे मिशन ऑलिंपिक
पारंपरिक आर्चरी व शूटिंग खेळाचे पुनरुज्जीवन
मिलिंद तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : पारंपरिक तिरंदाजी तसेच आधुनिक रायफल शूटिंग या दोन्ही क्रीडा प्रकारांना महाराष्ट्र कामगार मंडळाने नवी झळाळी दिली आहे. मंडळाने मुंबई येथील आपल्या कामगार क्रीडा भवनातील उपलब्ध जागेत या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीच्या सुविधा व मार्गदर्शक उपलब्ध करून दिले आहे. त्यातून ऑलिंपिक स्पर्धेसाठी अनेक खेळाडू तयार होतील, अशी मंडळाला आशा आहे.
कामगार तसेच त्यांच्या मुलामुलींना विविध खेळांत नैपुण्य मिळवून एशियाड व ऑलिंपिकसारख्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळावी, या उद्देशातून कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त रविराज इळवे यांनी हुतात्मा बाबू गेनू कामगार क्रीडा भवन येथे महाकल्याण क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून मिशन ऑलिंपिकची कल्पना मांडली. याअंतर्गत कामगार कल्याण भवनात मैदानी व इनडोअर तसेच बैठ्या खेळांच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. यामध्ये प्रामुख्याने पांरपरि तिरंदाजी तसेच नेमबाजीवर विषेश लक्ष देण्यात आले.
आर्चरी रेंज हा पारंपरिक खेळ असून, आशिया खंडात अत्यंत लोकप्रिय आहे. मुंबईतून मात्र हा खेळ नामशेष झाला आहे. या खेळाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी क्रीडा भवनच्या मैदानात २०२३ मध्ये ऑलिंपिक दर्जाची ७० मीटरची आर्चरी रेंज तयार करण्यात आली. ही मुंबईतील एकमेव आर्चरी रेंज असल्याचे सांगण्यात येते. प्रशिक्षणासाठी लागणारे आवश्यक भारतीय साहित्य ते परदेशी बनावटीचे रिकर्व्ह (कमान) तसेच कम्पाउंड प्रकारातील आठ हजार ते तीन-पाच लाख रुपये किमतीचे धनुष्यबाण साहित्यदेखील खेळाडूंसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. प्रशिक्षक मयूरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या २० ते २५ खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. यातील बहुतांश खेळाडू हे सामान्य कामगार कुटुंबातील आहेत.
मुंबईतील सर्वात प्रशस्त व अत्याधुनिक अशी १० मीटर एयर रायफल पिस्टल शूटिंग रेंजदेखील कामगार भवनात उभारण्यात आली आहे. २०२३मध्ये उभारण्यात आलेली शूटिंग रेंज ही ऑलिम्पिक दर्जाची आहे. या खेळाशी संबंधित सर्व आधुनिक साधनसामग्रीदेखील खेळाडूसाठी उपलब्ध करून दिली आहे. ऑलिंपिकच्या धर्तीवर अगदी ४२ हजारांपासून ते अडीच लाख रुपयांपर्यंतचे भारतीय आणि परदेशी बनावटीचे विविध प्रकारचे पिस्तूल आणि रायफल प्रशिक्षणासाठी उपलब्ध आहेत.
आमचे मिशन ऑलिंपिक २०२८ आहे. मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा देणारे हे एकमेव ठिकाण आहे. रायफल शूटिंग, आर्चरीसह इतर क्रीडा प्रकारांसाठी प्रशिक्षण व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती.
- रविराज इळवे, आयुक्त, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ
नौदलातील नेमबाजीच्या स्पर्धेची मी तयारी करीत आहे. जागतिक दर्जाची शूटिंग रेंज आणि प्रशिक्षक असल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे.
- दर्शन एम., खेळाडू
प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने जी सुविधा दिली आहे ती इतर कुठेही नाही. ऑलिंपिकच्या तयारीसाठी जी शूटिंग रेंज, साहित्य, प्रशिक्षक लागतात ते येथे उपलब्ध आहे. आम्ही ऑलिंपिक स्पर्धसाठी सज्ज आहोत.
- रवी कुमार, खेळाडू