कडुनिंबाचे महत्त्व सांगणारी आरोग्यदायी गुढी
सुनील पाटकर, महाड
भारतीय संस्कृतीत साजरा होणारा प्रत्येक सण हा आध्यात्मिक, धार्मिक व आरोग्यविषयक संदेश देत साजरा होतो. प्रत्येक सणामागे एक वेगळे शास्त्र दडले आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढपाडव्याला मराठी नववर्षाची सुरुवात होते. या वेळी उभारल्या जाणाऱ्या गुढीच्या सजावटीमध्ये कडुनिंबाची पाने अथवा डहाळ्यांनाही विशेष मान असतो. सुदृढ आरोग्यासाठी कडुनिंबाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने कडुनिंबाची पाने व गूळ यांचा प्रसाद यादिवशी आवडीने खाल्ला जातो.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी अनेकजण नव्या कामाची, व्यवसायाची सुरुवात करतात. वाहन, सोने-चांदी खरेदीसाठीही हा दिवस शुभ असल्याने शोरूम्स, सराफा बाजारात गर्दी असते. ग्रामीण भागात अंगणात, घरासमोर उंच गुढी उभारली जाते. शहरात जागेअभावी बाल्कनी, टेरेसवर गुढी उभारलेली दिसते.
गुढीलाच संबोधतात ‘ब्रह्मध्वज’
चैत्र पाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची रचना केली, अशी आख्यायिका आहे. यामुळे गुढीला ‘ब्रह्मध्वज’ असेही म्हटले जाते. बांबूची उंच काठी अर्थात वेलू काठी आणून ती स्वच्छ धुतली जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर पहाटे लवकर उठून स्नान केल्यानंतर गुढी तयार करून तिची पूजा केली जाते. गुढीसाठी वापरणारा तांब्या किंवा कलश स्वच्छ धुऊन पुसून त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढले जाते. गुढीसाठी रेशमी वस्त्र बांधून त्यामध्ये कलश उलटा ठेवला जातो. गुढीला फुलांचा हार, कडुनिंबाचा पाला तसेच आंब्याची डहाळी बांधतात. सोबत रंगीबेरंगी साखरमाळ बांधतात. पाटाखाली रांगोळी काढून त्यावर उंच गुढी उभी केली जाते. गुढीची हळद, कुंकू, फुले वाहून पूजा केली जाते. त्यानंतर नैवेद्य दाखवून याच दिवशी कडुनिंब व गुळाचा एकत्रित प्रसाद केला जातो.
आरोग्यदायी कडुनिंब
- गुढी सजावटीमध्ये व प्रसादामध्ये कडुनिंबाला एवढे महत्त्वाचे स्थान का देतात, याचे उत्तर आयुर्वेदामध्ये सापडते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि गूळ कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. यामुळे पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश होतो, त्वचारोग बरे होण्यास तसेच धान्यातील कीड थांबवण्यासाठीही कडुनिंब गुणकारी आहे.
- चैत्रपाडव्याच्या काळात वातावरणात उष्मा वाढलेला असतो. उष्माघाताचा त्रास कमी व्हावा, यासाठी प्रकृतीने थंड असलेल्या कडुनिंबाचा आहारात समावेश केला जातो. अंगाला खाज येणे अथवा त्वचेचे विकार असतील तर शरीराला थंडावा देणाऱ्या कडुनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालून स्नान करणे हितकारक मानले जाते.
- केसांसंबंधित कोणते विकार तसेच केसात कोंडा झाला असेल तर कडुनिंबाच्या पानांचा रस केसांना लावल्यास फायदेशीर ठरते. कडुनिंबाच्या पानांमुळे मधुमेही रुग्णांमध्ये साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. कडुनिंब थंड असल्याने शरीरातील उष्णता (पित्त) संतुलित करण्यास मदत करते आणि त्याला कडू, तुरट चव असते, जी शरीरातील कफ काढून टाकण्यास मदत करते.
- प्रसादाचा आणखी एक महत्त्वाचा भाग असलेल्या गुळामध्ये एंझाईम असतात, जे कडुनिंबात मिसळल्यावर नैसर्गिक विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. आयुर्वेदानुसार विषाणूजन्य ताप, सर्दी, खोकला आणि घसादुखी बरा करण्यासाठी फंगल आणि अँटीव्हायरल गुणधर्मांनी युक्त कडुलिंबाचे सेवन केल्यास आराम मिळतो.
- रक्त शुद्धीकरण, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे यामध्येदेखील कडुनिंब उपयुक्त ठरतो. गुढीपाडव्याला विजयाची गुढी उभारत असताना आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या ज्ञानाचीदेखील गुढी उभारली जात असल्याचे या सणातून दिसून येते.
....