चेन्नई सुपर किंग्सला शुक्रवारी (२८ मार्च) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध आयपीएल २०२५ स्पर्धेत ५० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. चेपॉक स्टेडियमवर बंगळुरूने तब्बल १७ वर्षांनी विजय मिळवला. चेन्नईचा हा यंदाच्या हंगामातील पहिला पराभव आहे, तर बंगळुरूचा दुसरा विजय आहे.
या सामन्यानंतर पत्रकार परिषदेसाठी न्यूझीलंडचे माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग उपस्थित होते. साधारणत: शांत स्वभावासाठी फ्लेमिंग यांना ओळखलं जातं. मात्र, यावेळी फ्लेमिंग यांचा पारा एका प्रश्नावर चढल्याचे दिसले.
खेळण्याच्या स्टाईलची तुलना इतर संघांशी केल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना फ्लेमिंग यांनी प्रश्नच हास्यास्पद असल्याचे म्हटले.
या सामन्यात १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला २० षटकात ८ बाद १४६ धावाच करता आल्या.
या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने विचारले की 'पहिल्या सामन्यात (मुंबई इंडियन्सविरुद्ध) तुम्ही १५६ धावांचा पाठलाग करण्यासाठी २० षटके खेळली. आज तुम्ही १४६ धावाच करू शकले. मला माहित आहे की ही तुमची खेळण्याची पद्धत आहे. पण तुम्हाला असं वाटत नाही का की ही पद्धत आता कालबाह्य होत आहे?'
त्यावर फ्लेमिंग म्हणाले, 'माझ्या पद्धतीने खेळणे, म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय? तुम्ही आक्रमकतेणे खेळण्याबद्दल बोलत असाल तर आमच्याकडे ती आक्रमकता आहे. मला हा प्रश्नच समजत नाही. कारण फक्त पहिल्या चेंडूपासून आम्ही आक्रमक खेळत नाही म्हणून आणि नशीब आमची साथ देतं, म्हणून का? शेवटी कोण जिंकतं बघुया, हे सकारात्मक क्रिकेट आहे. आम्हाला कमी लेखू नका.'
त्यावर पत्रकाराने विचारले की 'मी तुम्हाला कमी लेखत नाहीये.' त्यावर फ्लेमिंग म्हणाले, 'पण प्रश्न काहीसा तसाच होता, हास्यास्पद प्रश्न होता.'
याशिवाय आता घरच्या मैदानात खेळण्याचा फायदा मिळत नसल्याचेही त्यांनी सांगितले, कारण संघाला ही खेळपट्टी समजण्यास वेळ लागत असल्याचे म्हटले आहे.
ते म्हणाले, 'आम्ही गेल्या काही वर्षांपासून सांगत आहोत की चेपॉकमध्ये घरच्या मैदानाचा फायदा मिळत नाही. आम्ही बऱ्याचदा बाहेरच्या मैदानावर विजय मिळवतो. आम्हाला खेळपट्टी वाचता येत नाहीये, आम्ही याबद्दल प्रामाणिकपणे सांगत आहोत.'
फ्लेमिंग पुढे म्हणाले, 'गेल्या दोन वर्षांपासून आम्ही ही खेळपट्टी समजू शकत नाहीये. त्यामुळे त्या काही नवीन नाही. आम्हाला जे मिळत आहे, त्यानुसार खेळण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. हे जुन्या चेपॉकच्या मैदानासारखं नाहीये की तुम्ही चार फिरकीपटू खेळवू शकता. आम्ही खरंच खेळपट्टीचा स्वभाव ओळखण्यासाठी मेहनत घेत आहोत आणि हे जरा कठीण आहे.'
चेन्नईला पुढचा सामना ५ एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळयचा आहे.