सहा राज्यात गुढीपाडव्यास शोभायात्रा
esakal March 29, 2025 11:45 PM

सहा राज्यांत आज शोभायात्रा
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थेचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. २९ ः रत्नागिरी तालुक्यातील नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान व स्व-स्वरूप संप्रदाय यांच्या विद्यमाने महाराष्ट्रात गुढी पाडव्यादिवशी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर गोवा, गुजरात, तेलंगणा,मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक आदी राज्यांतही शोभायात्रा निघणार आहेत.
या सर्व मिरवणुकांत भारतीय संस्कृतीचे दर्शन होणार आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ४५ शहरांत या शोभायात्रा असतील. महाराष्ट्र व इतर राज्यात मिळून एकूण ६२ शोभायात्रा निघणार आहेत. गुढीपाडव्यादिवशी सकाळी सात वाजता या मिरवणुका सुरू होतील. हजारो अबालवृद्ध स्त्री-पुरुष, तरुणाई, मुले, मुली उत्साहाने सहभागी होणार आहेत. सर्व मिरवणुका सकाळी सात वाजता एकाच वेळी सुरू होणार आहेत. या मिरवणुकांमध्ये समाज प्रबोधन करणे, ऐतिहासिक, संतांची परंपरा सांगणारे चित्ररथ असणार आहेत. कलशधारी भगिनी भारतीय संस्कृती जपणारे देखावे असतील.
रत्नागिरी येथे शोभायात्रा सकाळी सहा वाजता सुरू होईल. येथील मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ती सुरू होईल. मंडणगड ते राजापूर या तालुक्यातील भक्त त्यात सहभागी होतील. यात संस्कृती कार्यक्रम, भजन, ढोलपथक, वाद्यवृंद सहभागी होणार आहे. दुपारी श्रीराम मंदिर येथे या शोभायात्रेची सांगता होईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.