MS Dhoni निवृत्त होतोय? गुवाहाटीत झालेल्या छोटेखानी सोहळ्याने चर्चेला उधाण Viral Video
esakal March 31, 2025 03:45 AM

इंडियन प्रीमियर लीग २०५ स्पर्धेचा ११ वा सामना रविवारी (३० मार्च) गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होत आहे. हे मैदान राजस्थान रॉयल्सने घरचे मैदान म्हणून स्वीकारले आहे.

बीसीसीआयने यंदा एकूण १३ शहरातील स्टेडियममध्ये आयपीएल सामन्यांचे आयोजन केले आहे. तसेच या १८ व्या हंगामात बीसीसीआयकडून प्रत्येक स्टेडियमवर एकदा खास सोहळे आयोजित करण्यात आले आहेत. १३ शहरातील या सोहळ्यांमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सचा परफॉर्मन्स पाहायला मिळत आहे.

रविवारी गुवाहाटीत होत असलेल्या या सामन्यापूर्वीही छोटेखानी सोहळा बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर झाला. या सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा रंगतदार परफॉर्मन्स पाहायला मिळाला.

दरम्यान, या परफॉर्मन्सनंतर सचिव देवजीत सैकिया यांच्याकडून चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार एमएस धोनीचा खास ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. या ट्रॉफीवर १८ असा आकडाही लिहिलेला दिसत आहे.

तथापि, सध्या निवृत्तीच्या चर्चा सातत्याने होताना दिसत आहेत. हा त्याचा अखेरचा आयपीएल हंगाम ठरणार का, अशा चर्चा होत आहेत. त्याचच तो खूपच खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत असल्यानेही त्याच्यावर टीका होत आहे. अशातच त्याचा रविवारी सन्मान केला गेल्याने तो या हंगामानंतर निवृत्ती घेणार की काय, अशी चर्चा होत आहे.

का झाला धोनीचा सन्मान?

खरंतर यंदा आयपीएलचा हा १८ वा हंगाम आहे म्हणजेच आयपीएलला १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या सर्व १८ हंगामात खेळलेल्या मोजक्या खेळाडूंचा सध्या बीसीसीआयकडून खास ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात येत आहे. त्यामुळे धोनीचाही सन्मान करण्यात आला.

धोनीनेही २००८ पासून प्रत्येक हंगाम खेळला आहे. त्याने २०१६ आणि २०१७ सालचा अपवाद वगळता इतर सर्व हंगामात चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या दोन वर्षी चेन्नई सुपर किंग्सवर बंदी असताना तो रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाकडून खेळला आहे. त्यामुळे तो सर्व १८ आयपीएल हंगामात खेळला आहे.

धोनीप्रमाणेच २२ मार्च रोजी कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील झालेल्या पहिल्या सामन्यापूर्वीच्या उद्घाटन सोहळ्यात विराट कोहलीचाही असाच सन्मान करण्यात आला होता. विराट तर पहिल्या हंगामापासून गेली १८ वर्षे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.