सोलापूर : चार वर्षीय सार्थक वळकुंदे याने बालवाडीत असताना प्रजासत्ताक दिनाला तीन पानाचे भाषण जसेच्या तसे गावकऱ्यांसमोर म्हणून सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्यावेळी गावकऱ्यांकडून त्याला १४०० रुपयांचे बक्षीस मिळाले. अभ्यासात हुशार सार्थक सहावीपर्यंत फोंडशिरसच्या शाळेत शिकला. त्याच्याकडून खूप अपेक्षा असल्याने आई-वडिलांनी नातेपुते येथील संत बाळूमामा संचलित ज्ञानज्योती इंग्लिश मीडियममध्ये प्रवेश घेतला होता. चालू वर्षातील अंतिम सत्रातील शेवटचे दोन पेपर राहिले असतानाच त्याचा अपघाती मृत्यू झाला आणि संपूर्ण मारकडवाडीवरच शोककळा पसरली.
नातेपुते येथे संत बाळूमामा संचलित ज्ञानज्योती इंग्लिश मीडियम स्कूल आहे. सार्थक शाळेत खूप हुशार होता, शेती व किराणा दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणाऱ्या आई-वडिलांना त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. त्यामुळे त्यांनी त्याला फोंडशिरसमधील मराठी शाळेतून काढून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले होते. पहिल्याच वर्षी तो शाळेत सर्वांचा लाडका विद्यार्थी बनला होता. गावात देखील तो खूप हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. गावातील भजन- कीर्तनात तो असायचा आणि आता तो त्यात पखवाज देखील वाजवत होता. मोठ्या स्पर्धांमध्ये गावातील पोरं त्याला क्रिकेट समालोचन करायला देखील बोलवायची. २०२४-२५ च्या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्राची परीक्षा काही दिवसांपूर्वी सुरू झाली होती. शेवटचे दोन पेपर राहिले होते. परीक्षा संपली की मामाच्या गावाला जायचे नियोजन त्याच्या घरात सुरू होते.
२५ मार्च रोजी नेहमीप्रमाणे सार्थक शाळेला जाण्यासाठी रिक्षात बसला आणि फोंडशिरस ते दहिगाव रोडवर अपघात होऊन सार्थक गेला, अशी खबर त्याच्या पालकांपर्यंत पोचली आणि त्यांनी हंबरडा फोडला. सार्थकच्या मृत्यूप्रकरणी संस्था चालक सतीश राऊत व रिक्षा चालक महादेव बळी गोरे यांच्याविरुद्ध नातेपुते पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आता त्या शाळेला धर्मादाय आयुक्तालयाची मान्यता आहे का?, शाळेने रिक्षा का लावली, यादृष्टीने तपास सुरू केला आहे. सार्थकला न्याय मिळावा, अशी आशा त्याच्या आजोबा, आई-वडिलांना आहे.
शाळेने स्कूल बस बंद करून मुलांसाठी सुरू केली होती रिक्षा
पालकांकडून दरमहा १५०० रुपये शुल्क घेणाऱ्या शाळेने मुलांना ने-आण करण्यासाठी स्वतंत्र स्कूलबस सुरू केली होती. पण, मागच्या दोन महिन्यांपासून पालकांच्या परस्परच शाळेने मुलांसाठी रिक्षा सुरू केली होती, असे फिर्यादी दादासाहेब वळकुंदे यांचे म्हणणे आहे. पालकांनी त्यासंदर्भात विचारणा केल्यावर दोन-चार दिवसांत पुन्हा स्कूलबस सुरू होईल, असे शाळेकडून सांगण्यात आले होते. पण, स्कूलबस सुरू झालीच नाही आणि रिक्षा उलटून अपघात झाला आणि त्यात सार्थकचा मृत्यू झाला.