Prajakta Tanpure : आरोपीला अटक न केल्यास राहुरी बंद: माजी मंत्री प्राजक्त तनपुरे; राहुरीतील पुतळा विटंबना प्रकरण
esakal March 31, 2025 05:45 PM

राहुरी : शहरात राष्ट्रपुरुषाचा अर्धकृती पुतळा विटंबन करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करावी; अन्यथा येत्या मंगळवारपासून आरोपींला अटक होईपर्यंत राहुरी शहर बेमुदत बंद ठेवले जाईल. राहुरी नगरपरिषदेच्या मालकीच्या बुवासिंद बाबा तालमीमध्ये घटना घडली. मुख्याधिकाऱ्याची जबाबदारी होती. त्यांना निलंबित करून चौकशी करावी, असे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अमेरिकेतून ऑडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तनपुरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, बुधवारी दुपारी दोन वाजता घटना निदर्शनास आली. त्याचे तीव्र पडसाद उमटले. शिवप्रेमींनी दोन तास रास्तारोको आंदोलन केले. त्यावेळी आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस खात्याने दोन दिवसांचा वेळ मागितला होता. त्यांची मुदत संपली आहे.

आरोपीला अद्याप अटक केली नाही. संशयित म्हणून सुद्धा कोणत्याही आरोपीला अटक केलेली नाही. त्यामुळे तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. येत्या दोन दिवस गुढीपाडवा व रमजान ईद सण आहेत. सणांच्या काळात व्यापारी, नागरिकांना त्रास नको, म्हणून पोलिस खात्याला आणखी दोन दिवस वेळ वाढवून दिला आहे.

येत्या दोन दिवसांत आरोपीला अटक करावी. त्याच्या चेहऱ्याला काळे फासून शहरातून धिंड काढावी. जेणेकरून कुणीही असा प्रकार करण्यास धजावणार नाही. राहुरी नगरपरिषदेच्या मालकीच्या व्यायामशाळेत प्रकार घडला आहे. राहुरी नगरपरिषदेची चार वर्षांपासून निवडणूक झालेली नाही. प्रशासक असलेले मुख्याधिकारी यांची जबाबदारी होती. तालमीत ठेवलेल्या मूर्तीला परवानगी घेतली होती काय? त्याकडे मुख्याधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्यांना निलंबित करून, चौकशी करावी, अशी मागणी आहे.

महायुतीच्या काळात राष्ट्रपुरुषांचा अवमान, पुतळ्याची विटंबना नित्याची झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. सोलापूरकर, कोरटकर यांनी अपशब्द वापरून अवमान केला. कुणीही उठून राष्ट्रपुरुषांना टार्गेट करीत आहे. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावत आहेत. येत्या एक एप्रिलपासून आरोपी अटक होईपर्यंत राहुरी शहर बेमुदत बंद ठेवले जाईल, असेही तनपुरे यांनी सांगितले.

आमदार शिवाजी कर्डिले यांनी घटनास्थळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याची घोषणा केली. कायद्यानुसार एवढे सोपे नाही, याची त्यांना माहिती आहे. त्यांनी मुंबईला जाऊन बसावे. राज्यात, केंद्रात त्यांचे सरकार आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आरोपींच्या अटकेसाठी पोलिस खात्यावर दबाव टाकावा, अशी शिवप्रेमींची अपेक्षा आहे.

- प्राजक्त तनपुरे, माजी आमदार, राहुरी.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.