RSS : उपहास ते स्वीकार असा संघाचा प्रवास; रा. स्व. संघाचे सरकार्यवाह होसबाळे यांचे प्रतिपादन, विरोधकांनाही बरोबर घेणार
esakal March 31, 2025 05:45 PM

नवी दिल्ली : राष्ट्र पुनर्निर्माणाच्या चळवळीतून उदयास आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रवास हा, दुर्लक्ष्य आणि उपहास ते कुतूहल आणि स्वीकार असा झाला आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी व्यक्त केले. रा. स्व. संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त होसबाळे यांनी संघाशी निगडित एका संकेतस्थळावर रविवारी त्यांचे विचार मांडले आहेत.

आरएसएस ॲट १००’ या लेखात होसबाळे यांनी म्हटले आहे की, एखाद्याचा विरोध करणे ही संघाची विचारधारा नाही; उलट संघाला असा विश्वास वाटतो की, एक न एक दिवस जे संघाला विरोध करतात ते संघात सामावले जाऊन संघकार्य करू लागतील. ‘‘जग सध्या हवामान बदलापासून ते रक्तरंजित संघर्षांपर्यंत अनेक आव्हानांशी झगडत असताना, भारताचे प्राचीन आणि अनुभवसिद्ध ज्ञान या समस्यांवर उत्कृष्ट उपाय शोधण्यास सक्षम आहे.

हे अफाट मोठे कार्य आहे पण ते करावे लागणार आहे आणि ते तेव्हाच शक्य आहे, जेव्हा प्रत्येक भारतीय आपली भूमिका समजून घेईल आणि इतरांना अनुकरणासाठी प्रेरणा देणारा स्वदेशी आदर्श प्रस्थापित करण्यासाठी आपले योगदान देईल,’’ असे प्रतिपादन होसबाळे यांनी केले.

सज्जनशक्तीचे संघटन

सर्व समाजाला एकत्र करून, सज्जन शक्तीच्या नेतृत्वाखाली सौहार्द असणारा संघटित भारत जगासमोर आदर्श म्हणून सादर करण्याचा निर्धार आपण करू या,’’असे आवाहनही त्यांनी केले. होसबाळे यांनी संघाच्या शंभर वर्षांच्या कार्यकाळाचाही आढावा या लेखात घेतला आहे. संघ शंभरीत प्रवेश करत असताना संघाच्या कार्यशैलीबद्दल अनेकांना कुतूहल आहे, असा दावा त्यांनी केला.

‘वैचारिक पाया बळकट केला’

होसबाळे यांनी त्यांच्या लेखात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव गोळवलकर गुरुजी यांचेही स्मरण केले, ‘‘श्री गुरुजी यांनी संघाचा वैचारिक पाया बळकट केला,’’ असे प्रतिपादन होसबाळे यांनी केले.

हेडगेवारांचे स्मरण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांच्या जयंती निमित्त होसबाळे यांनी, त्यांचेही स्मरण या लेखात केले आहे. डॉ. हेडगेवार हे प्रखर देशभक्त होते. त्यांनी सशस्त्र क्रांतीपासून ते सत्याग्रहापर्यंत सर्व मार्गांचा सन्मान करून स्वातंत्र्य मिळवण्यावर त्यांचा विश्वास होता.

बाल्यावस्थेपासून हेडगेवारांचे मातृभूमीबद्दलचे निरपेक्ष प्रेम त्यांच्या जीवनातील विविध घटनांतून अधोरेखित होते, असे ते म्हणाले. आपला देश वारंवार पारतंत्र्यात का जात आहे? याचे कारण शोधून त्यावर काम करण्यासाठी, प्रखर राष्ट्रभक्तीचे बाळकडू देण्यासाठी व राष्ट्राच्याउन्नतीसाठी संघटित प्रयत्न करण्यासाठी हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली, असेही ते म्हणाले.

उत्सवबाजी नाही

‘‘संघासाठी असे प्रसंग हे उत्सवबाजीसाठी नसतात तर, आत्मपरीक्षण करून नव्या जोमाने आपले ध्येय साध्य करण्यासाठी झोकून देण्यासाठी अशा प्रसंगांतून प्रेरणा घेतली जाते,’’ असे होसबाळे म्हणाले. त्याचप्रमाणे निरपेक्ष भावनेने संघासाठी योगदान देणाऱ्या स्वयंसेवकांचे आणि त्यांच्या या प्रवासात त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांचेही या निमित्ताने स्मरण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.